05 April 2020

News Flash

अजित पवार यांना राष्ट्रीय कबड्डी संघटनेचे वेध!

राज्य कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा त्याग केला आणि खो-खोचे अध्यक्षपद मात्र कायम ठेवले होते.

 माजी उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या संघटनात्मक मैदानांवर चढायांसाठी सज्ज झाले आहेत. राज्यात २५ नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पवारांनी पुन्हा अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी केल्याचे म्हटले जात आहे. याचप्रमाणे भारतीय कबड्डी संघटनेची रणधुमाळी सुरू झाली आहे. भारतीय कबड्डी संघटनेच्या निवडणुकीसाठी राज्यांचे नामनिर्देशित प्रतिनिधी म्हणून सध्याचे अध्यक्ष किशोर पाटील यांचे नाव पाठवण्यात आले होते. मात्र चार दिवसांत त्यांच्याऐवजी अजित पवार यांचे नाव राज्य संघटनेकडून बदलण्यात आले आहे. त्यामुळे ते राष्ट्रीय संघटनेत पद भूषवण्यासाठीही उत्सुक असल्याची चर्चा राज्याच्या कबड्डीक्षेत्रात आहे.

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या अध्यक्षपदावर पुन्हा विराजमान व्हावे, या दृष्टीने ऑगस्ट महिन्यात झालेल्या महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या निवडणुकीत त्यांनी अध्यक्षपदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संजीवराजे विजयसिंह नाईक-निंबाळकर हे खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदावर निवडून आले होते.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याकडे एकाच संघटनेचे पद असणे बंधनकारक असल्यामुळे २०१३मध्ये अजित पवार यांनी राज्य कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा त्याग केला आणि खो-खोचे अध्यक्षपद मात्र कायम ठेवले होते. त्यानंतर त्यांच्या विश्वासल्या व्यक्तींकडेच राज्य कबड्डीची सूत्रे होती. परंतु आता पुन्हा त्यांनी राज्य कबड्डीच्या दृष्टिकोनातून व्यूहरचना आखली आहे.

काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने भारतीय कबड्डी संघटनेवरील जनार्दनसिंह गेहलोत यांच्या कुटुंबीयांची सत्ता संपुष्टात आणली. त्यामुळे आता न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रणाली राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग  म्हणून भारतीय हौशी कबड्डी संघटनेला संलग्न असलेल्या राज्य संघटनांना प्रत्येकी दोन नामनिर्देशित प्रतिनिधींची नावे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने १ ऑक्टोबरला अध्यक्ष किशोर पाटील आणि सरचिटणीस आस्वाद पाटील यांची नावे पाठवली होती. परंतु ४ ऑक्टोबरला राज्य संघटनेने नवे पत्र पाठवून अध्यक्ष किशोर पाटील यांच्या जागी अजित पवार यांचे नाव पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पवार यांचे नाव अचानक समाविष्ट केल्यामुळे त्यांच्या राज्य आणि राष्ट्रीय संघटनांमधील भावी वाटचालीविषयी प्रयत्नांना दुजोरा मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2018 3:11 am

Web Title: ajit pawar eyes on national kabaddi association
Next Stories
1 भारत ‘ब’ संघाच्या विजयात फिरकीपटूंची चमक
2 सुवर्णपदक हुकल्याची पुनियाला खंत
3 मेघ ठक्कर ‘आयर्नमॅन’
Just Now!
X