महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (एमओए)अध्यक्षपदी अजित पवार तर सरचिटणीसपदी बाळासाहेब लांडगे यांची बिनविरोध निवड झाली. मात्र कार्यकारिणी सदस्यांच्या आठ जागांकरिता २६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे.
एमओएचे विद्यमान अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी यंदा ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्या जागी त्यांचे पुतणे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच निवड होणार हे यापूर्वीच निश्चित झाले होते. राज्य खो-खो संघटनेचे ते अध्यक्ष असून एमओएच्या अध्यक्षपदाकरिता त्यांच्या एकटय़ाचाच अर्ज आला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांसाठी अर्ज देण्याची मुदत शनिवापर्यंत होती. संघटेच्या परंपरेनुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहचिटणीस, खजिनदार आदी पदांकरिता जेवढय़ा जागा आहेत, तेवढेच अर्ज आल्यामुळे या पदांची निवडणूक टळली. उपाध्यक्षपदी प्रल्हाद सावंत, अशोक पंडित, प्रदीप गंधे, जय कवळी यांची तर सहसचिवपदी प्रकाश तुळपुळे व महेश लोहार यांची निवड झाली. खजिनदारपदी धनंजय भोसले यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्यांच्या आठ जागांकरिता अशोकसिंग रजपूत, प्रशांत देशपांडे, एम.एफ.लोखंडवाला, दयानंद कुमार, रवींद्र कांबळे, एम.व्यंकटेश, महंमद वली, किशोर वैद्य, प्रताप जाधव, सुंदर अय्यर, मोहन भावसार व शीला कानुगो या दहा जणांचे अर्ज आले आहेत.