माजी उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या सत्तासंघर्षांतून माघार घेण्याचे ठरवले आहे.

नवी दिल्ली येथील हॉटेल ईरॉसमध्ये १ सप्टेंबरला होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राकडून सरकार्यवाह आस्वाद पाटील आणि स्वीकृत सदस्य बाबुराव चांदेरे या दोघांची नावे पाठवण्यात आल्यामुळे अजित पवार निवडणुकीच्या रिंगणाबाहेर असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नाहीत. मात्र गेले काही महिने त्यांच्याकडून भारतीय कबड्डी संघटनेच्या निवडणुकीसाठी जोरदार मार्चेबांधणी सुरू होती.

रायगडच्या वर्चस्वाबाबत नाराजी

राष्ट्रीय कबड्डी संघटनेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे आस्वाद पाटील आणि बाबुराव चांदेरे हे दोन्ही सदस्य रायगडचेच नामनिर्देशित सदस्य असल्यामुळे काही जिल्हा संघटकांनी नाराजी प्रकट केली आहे. ही नावे कार्यकारिणी समितीच्या सभेत निश्चित झालेली नाहीत. याबाबत आगामी कार्यकारिणी समितीच्या बैठकीत आम्ही जाब विचारू, असे एका जिल्हा संघटकाने सांगितले.

पश्चिम-दक्षिणेकडील आघाडीला महाराष्ट्राचा पाठिंबा

आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दनसिंह गेहलोत यांचे पुत्र तेजस्वीसिंह गेहलोत यांच्या गटाला आव्हान देणाऱ्या पश्चिम-दक्षिणेकडील काही संघटनांना महाराष्ट्राचा पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आता गेहलोत कुटुंबीयांची सत्ता अबाधित राखण्यासाठी उत्तर आणि पूर्व विभागातील राज्य संघटना विद्यमान सरचिटणीस तेजस्वीसिंह यांच्या पाठीशी आहेत.

शिस्तपालन समितीपुढे महिला संघाची रविवारी साक्ष

राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेच्या साखळीत गारद होण्याची नामुष्की पत्करणाऱ्या महाराष्ट्राच्या संघातील खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक यांना रविवारी शिस्तपालन समितीसमोर चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. चुकीच्या माहितीवर आधारलेली रणनीती अपयशी ठरल्यामुळे महाराष्ट्राचे आव्हान यंदा गटसाखळीतच संपुष्टात आले. त्यानंतर संघटनेकडे संघाचा स्पर्धेबाबतचा अहवालसुद्धा सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर शिस्तपालन समिती कोणते निष्कर्ष काढते, याकडे कबड्डीक्षेत्राचे लक्ष लागले आहे.