मुंबईचा ५३१ धावांचा डोंगर
गुजरातची ३ बाद १०२ अशी अवस्था
डावखुरा सलामीवीर फलंदाज अखिल हेरवाडकरचे पहिलेवहिले द्विशतक फक्त आठ धावांनी हुकले; परंतु तरीही मुंबईने गुजरातविरुद्धच्या रणजी सामन्यात पहिल्या डावात ५३१ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर गुजरातने ३ बाद १०२ धावा केल्या.
हेरवाडकरने तब्बल साडेआठ तास मैदानावर ठाण मांडला आणि ३२६ चेंडूंचा सामना करीत २२ चौकार आणि दोन षटकारांसह १९२ धावा केल्या. संयमी फलंदाजी करीत द्विशतकाकडे कूच करणाऱ्या हेरवाडकरचा प्रियांक पांचाळने त्रिफळा उडवला. सकाळच्या सत्रात शतकवीर सूर्यकुमार यादव (१०४) लवकर तंबूत परतला. त्यानंतर ठरावीक अंतराने मुंबईचे फलंदाज बाद होत गेले. अखेर चहापानाला अर्धा तासाचा अवधी असताना मुंबईचा डाव आटोपला.
मुंबईच्या भक्कम धावसंख्येला सामोरे जाताना अशद पठाण आणि पांचाळ (३६) यांनी ४१ धावांची सलामी दिली; परंतु त्यानंतर ३३ चेंडूंत आणि १२ धावांत त्यांचे तीन फलंदाज बाद झाले. त्यामुळे गुजरातची ३ बाद ५३ अशी केविलवाणी अवस्था झाली. बलविंदर सिंग संधूने गुजरातला पहिला धक्का दिला. मग मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने लागोपाठच्या षटकांमध्ये दोन बळी मिळवले. गुजरातचा फलंदाज भार्गव मेराई ६६ चेंडूंत ६ चौकारांसह ४१ धावांवर खेळत आहे.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : १४१.२ षटकांत सर्व बाद ५३१ (अखिल हेरवाडकर १९२, सूर्यकुमार यादव १०४, श्रेयस अय्यर ७५; आर. पी. सिंग २/७४, रूश कलारिया २/९६, अक्षर पटेल ३/९९)
गुजरात (पहिला डाव) : ३० षटकांत ३ बाद १०२ (भार्गव मेराई ४१*, किरीट पांचाळ ३६; शार्दूल ठाकूर २/२१).