श्रीलंकेचा फिरकीपटू अकिला धनंजयावर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. वादग्रस्त गोलंदाजी शैलीमुळे चर्चेत आलेल्या धनंजयावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडच्या श्रीलंका दौऱ्यात धनंजयाच्या गोलंदाजी शैलीवर आक्षेप घेण्यात आला होता. यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात धनंजयाला संघात स्थान मिळालं नव्हतं.

डिसेंबर २०१८ साली धनंजयाच्या गोलंदाजी शैलीवर पहिल्यांदा आक्षेप घेण्यात आला होता. मात्र फेब्रुवारी २०१९ मध्ये त्याच्यावर घालण्यात आलेली बंदी उठवण्यात आली होती. आयसीसीच्या नियमानुसार दोन वर्षांच्या काळात गोलंदाजावर दोनवेळा वादग्रस्त गोलंदाजी शैलीचा आक्षेप घेण्यात आल्यास त्याला एका वर्षाच्या बंदीच्या शिक्षेला सामोरं जावं लागतं. वर्षभराचा कार्यकाळ उलटण्यानंतर धनंजया आयसीसीकडे पुन्हा एकदा दाद मागू शकतो.

श्रीलंकेच्या संघासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. गॅले कसोटीमध्ये धनंजयाने न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद केला होता. यानंतर टी-२० मालिकेतही अकिलाने भेदक मारा करत ६ बळी घेतले होते. या बंदीमुळे धनंजया श्रीलंकेच्या टी-२० विश्वचषकासाठीच्या संघात खेळू शकणार नाहीये.