अक्षर पटेल ४-०-२१-४

फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने यंदाच्या आयपीएल हंगामातील पहिलीवहिली हॅट्ट्रिक साकारली आणि किंग्ज ईलेव्हन पंजाबने गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या गुजरात लायन्सलाच पराभवाचा धक्का दिला. मुरली विजयची अर्धशतकी खेळी व पटेलचे २१ धावांत ४ बळी या बळावर पंजाबने गुजरातचा २३ धावांनी पराभव केला.

गुजरात लायन्सने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी स्वीकारून पंजाबला १९.५ षटकांत १५४ धावांत गुंडाळले. पंजाबकडून विजय आणि मार्कस स्टॉयनिस (२७) यांनी ६५ धावांची दमदार सलामी दिली. विजयने ४१ चेंडूंत ६ चौकारांसह ५५ धावा केल्या. मग विजयने डेव्हिड मिलर (३१) सोबत पाचव्या विकेटसाठी २७ धावांची, तर वृद्धिमान साहा (३३) सोबत सहाव्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी रचली. मिलर बाद झाल्यावर मग पुन्हा पंजाबची घसरगुंडी उडाली.

त्यानंतर गुजरातच्या डावात मोहित शर्माने दुसऱ्याच षटकात ब्रेंडन मॅक्क्युलमला (१) बाद केले. मग पाचव्या षटकात त्याने सुरेश रैनाचा (१८) त्रिफळा भेदला. अक्षर पटेलचे सातवे षटक सामन्याला कलाटणी देणारे ठरले. त्याने तिसऱ्या चेंडूवर सर्वप्रथम स्फोटक ड्वेन स्मिथला (१५) बाद केले. मग पाचव्या व सहाव्या चेंडूंवर अनुक्रमे दिनेश कार्तिक (२) व ड्वेन ब्राव्हो (०) यांचे त्रिफळे उडवले. त्यानंतर ११व्या षटकाच्या पहिल्या चेंडूंवर रवींद्र जडेजाला (११) वृद्धिमान साहाकडे झेल देण्यास भाग पाडले व हॅट्ट्रिक साकारली. त्यामुळे गुजरातची ६ बाद ५७ अशी अवस्था झाली. त्यानंतरही इशन किशन (२७), जेम्स फॉकनर (३२)  व  प्रवीण कुमार (१५) यांनी जिद्दीने किल्ला लढवला.

संक्षिप्त धावफलक

किंग्ज ईलेव्हन पंजाब : १९.५ षटकांत सर्व बाद १५४ (मुरली विजय ५५; शिविल कौशिक ३/२०) विजयी वि. गुजरात लायन्स : २० षटकांत ९ बाद १३१ (जेम्स फॉकनर ३२, इशन किशन २७; अक्षर पटेल ४/२१)

सामनावीर : अक्षर पटेल.