खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी युवा डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिलेल्या माहितीनुसार, खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे रवींद्र जडेजा भारतात परतत आहे. त्याच्या जागी उर्वरित मालिकेसाठी अक्षर पटेलचा भारतीय संघात समावेश करण्यात आहे.
२० वर्षीय अक्षरने ९ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि यात १४ बळी मिळवले आहेत. श्रीलंकेविरुद्ध ४० धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
धवन, कोहली तंदुरुस्त
मेलबर्न : भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि उपकर्णधार विराट कोहली हे दुखापतीतून सावरले असून मेलबर्न येथे २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. दुसऱ्या कसोटी सामन्यात गाबाच्या खेळपट्टीवर चौथ्या दिवशी नेटमध्ये सराव करताना उसळता चेंडू धवनच्या मनगटावर तर कोहलीच्या हातावर आदळला होता.