Ind vs Eng : इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत आज चौथ्या दिवसअखेर भारताने ३ बाद ५८ धावांपर्यंत मजल मारली. त्याआधी इंग्लंडने दुसरा डाव ८ बाद ४२३ धावांवर घोषित केला. या डावात अनुभवी कुकने सर्वाधिक १४७ धावा केल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला. त्याने ७६ धावांचा टप्पा ओलांडताना सर्वाधिक कसोटी धावांच्या यादीत पाचवे स्थान पटकावले. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा १५,९२१ धावांसह अव्वलस्थानी आहे. तर रिकी पॉन्टिंग १३,३७८ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. पण या दोघांनाही जे जमलं नाही, ते कूकने अंतिम सामन्यात करून दाखवलं.

पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात शतक झळकावणारा तो इंग्लंडचा पहिला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पाचवा फलंदाज ठरला. याआधी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने कसोटी कारकीर्दीतील पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात शतक झळकावले होते. अझरने १९८४मध्ये कोलकाता कसोटीत भारतीय संघाकडून पदार्पण केले होते आणि त्या सामन्यात ११० धावांची खेळी केली होती. २०००मध्ये बेंगळुरू कसोटीनंतर अझरने निवृत्ती घेतली. या कसोटीत त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०२ धावांची खेळी केली होती. याशिवाय, ग्रेग चॅपेल, विल्यम पॉन्सफोर्ड आणि रेगिनॉल्ड डफ हे असा पराक्रम करणारे आणखी तीन फलंदाज आहेत. पण सचिन किंवा रिकी पॉन्टिंगला हा पराक्रम करता आला नव्हता.

दरम्यान, कूकचे आजचे शतक कसोटी कारकीर्दीतील त्याचे ३३वे शतक होते. ७६ धावांचा टप्पा ओलांडताच त्याने सर्वाधिक कसोटी धावांच्या रेकॉर्डमध्ये श्रीलंकेचा माजी कसोटीपटू कुमार संगकाराला मागे टाकत पाचवे स्थान पटकावले. संगकाराने १३४ कसोटी सामन्यांत २९१ डावांमध्ये १२ हजार ४०० धावा केल्या असून कूकने आजच्या शतकी खेळीबरोबच १२ हजार ४७२ धावांचा टप्पा गाठून आपल्या कारकीर्दीला पूर्णविराम दिला.