अहमदाबादच्या नव्या कोऱ्या नरेंद्र मोद क्रिकेट स्टेडिअमवर फिरकीच्या बळावर भारताने गुरुवारी विजयाक्षरे उमटवली. या दोन दिवसीय फिरकीच्या महोत्सवाच्या बुधवारी पहिल्या दिवशी १३ आणि गुरुवारी दुसऱ्या दिवशी १७ फलंदाज बाद झाले. इंग्लंडचे ४९ धावांचे तटपुंजे लक्ष्य आरामात पेलत भारताने ७.४ षठकांत १० गडी राखून तिसरी कसोटी जिंकली आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली. दोन्ही डावांत मिळून ११ बळी मिळवणारा अक्षर पटेल भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. तिसरा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसात संपल्यानंतर अनेक दिग्गजांनी मोटेराच्या खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यामध्येच आता इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक यानेही उडी घेतली आहे. कूक यानं खेळपट्टीवर निशाणा तर साधलाच त्याशिवाय विराट कोहलीच्या वक्तव्यावर नाराजीही व्यक्त केली.

चॅनल ४ सोबत बोलताना कूक म्हणाला की, ‘विराट कोहलीने केलेली खेळपट्टीची पाठराखण पाहून मला आश्चर्य वाटले. बीसीसीआयप्रमाणे त्यानं खेळपट्टीची पाठराखण केली आहे.. इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली, परंतु म्हणून तुम्ही फक्त फलंदाजांवर खापर फोडू शकत नाही. खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी योग्य नव्हती. त्यामुळेच दोन दिवसांत निकाल लागला.’

कोहली नेमकं काय म्हणाला होता?
खेळप्टी नव्हे तर सुमार फलंदाजीमुळे तिसरा कसोटी सामना दोन दिवसांत निकाली ठरला, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीनं व्यक्त करत मोटेराच्या खेळपट्टीची पाठराखण केली. पहिल्या जावात खेळपट्टी फलंदाजीसाठी पूर्णपणे योग्य होती. फक्त काही चेंडू अचानक उसळी घेत होते. माझ्या मते या सामन्यात दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली नाही. भारतीय संघ ३ बाद १०० अशा सुस्थितीत असतानाही १५० धावांच्या आत तंबूत परतला, असं कोहलीनं सांगितलं.

रुट काय म्हणाला?
‘मोटेराची खेळपट्टी खूपच आव्हानात्मक होती. येथे फलंदाजी करणं कठीण होतं. पण खेळपट्टी कशी होती, याचा निर्णय खेळाडू करु शकत नाही. हे आयसीसीचं काम आहे. पण एक खेळाडू म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपलं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करायचं असतं.’ पहिल्या डावांत मोठी धावसंख्या उभारण्याची संधी आम्ही गमावली. पहिल्या डावांत आम्ही २५० पर्यंत धावसंख्या उभारली असती तर निकाल वेगळा लागला असता. ती संधी आम्ही गमावली.