सलगच्या तीन पराभवांमुळे इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकवर कडाडून टीका होत आहे. पण भारताविरुद्धच्या मालिकेत पराभव पत्करावा लागला तरी मी एकदिवसीय कर्णधारपद सोडणार नाही, असे कुकने स्पष्ट केले आहे.
पाच सामन्यांच्या या मालिकेत भारताने ३-० अशी आघाडी घेतली आहे. ‘‘कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा मी विचारही करत नाही. इंग्लंड संघ व्यवस्थापनाने माझ्यावर विश्वास दाखवला, तर २०१५ विश्वचषकात इंग्लंडचे नेतृत्व सांभाळण्याची माझी इच्छा आहे. विश्वचषकाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच मी इंग्लंडचे नेतृत्व स्वीकारले आहे. सलग तीन सामने गमावल्यामुळे आमच्यावर टीका होणे स्वाभाविक आहे. पण क्रिकेटमध्ये असे घडत असतेच. चौथ्या सामन्यात आम्हाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. सुरुवातीचे फलंदाज लवकर माघारी परतल्यावर मधल्या फळीतील फलंदाजांवर प्रचंड दडपण येते. म्हणूनच या सामन्यात आम्ही मुसंडी मारू शकलो नाही,’’ असेही कुकने सांगितले.