भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंगचे पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा बॉक्सिंगपटू महम्मद अली कमर यांची भारताच्या महिला संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

शिवसिंग यांच्या जागी कमर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कमर हे अवघ्या ३८ वर्षांचे असून ते वर्षभरापासून साहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. कमार यांनी २००२ च्या मॅँचेस्टर राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला लाइट फ्लायवेट गटात सुवर्णपदक मिळवून दिले होते. ते भारताचे राष्ट्रकुलमधील पहिले सुवर्णपदक होते.

कोलकाताचे रहिवासी असलेल्या कमार यांच्यासोबत इटलीचे प्रशिक्षक राफेल बर्गमॅस्को यांच्यासह अन्य सात प्रशिक्षक आहेत. पुरुषांच्या प्रशिक्षकपदी गुरबक्ष सिंग संधू यांच्या जागी सी. ए. कुटप्पा यांची नियुक्ती केल्यानंतरच महिला प्रशिक्षक अनुप कुमार यांनाही बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. साहाय्यक प्रशिक्षकपदी रुजू झाल्यानंतर वर्षभरातच मुख्य प्रशिक्षकपद मिळेल, अशी अपेक्षा नव्हती, असे कमर यांनी सांगितले.