आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात शनिवारी दिल्लीच्या पटियाला न्यायालयाने श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडेला या खेळांडूसह अन्य ४१ जणांची निर्दोष मुक्तता केली. अपुऱ्या पुराव्याअभावी या सगळ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या दिल्ली पोलीसांच्या विशेष पथकाने १६ मे २०१३ रोजी स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली मुंबईतून श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडेला यांना अटक केली होती. पोलीसांकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात ४४ आरोपींची नावे नमूद करण्यात आली होती. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयामुळे या तिन्ही खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे त्यांच्यासाठी पुन्हा खुले झाले आहेत.