जपानच्या नोझोमी ओकुहाराविरुद्ध क्षुल्लक चुकांची पुनरावृत्ती

बर्मिगहॅम : जागतिक सुवर्णपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला शुक्रवारी ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. जपानच्या नोझोमी ओकुहाराने सिंधूने केलेल्या क्षुल्लक चुकांचा लाभउचलून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. त्याशिवाय महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांनाही पराभव पत्करावा लागल्याने भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

चौथ्या मानांकित ओकुहाराने २४ वर्षीय सिंधूला १२-२१, २१-१५, २१-१३ असे हरवले. एरिना बर्मिगहॅमवर झालेला हा सामना ओकुहाराने एक तास आणि आठ मिनिटांत जिंकला.

गतवर्षी ओकुहारालाच धूळ चारून जागतिक सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या सहाव्या मानांकित सिंधूने या लढतीतही धडाक्यात सुरुवात केली. पहिल्या गेममध्ये तिने ३-० अशी दमदार सुरुवात केली. ओकुहाराच्या बॅकहॅण्डवर सातत्याने दडपण आणत तिने मध्यंतराला ११-६ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर ओकुहाराने झुंज देत एकवेळ १६-११ अशी गुणसंख्या केली. परंतु सिंधूने गुणांचा सपाटा लावताना २१-१२ अशा फरकाने पहिला गेम जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये मात्र २५ वर्षीय ओकुहाराने झोकात पुनरागमन केले. सिंधूच्या कमकुवत बाजूंची ओकुहाराला पुरेशी जाणीव असल्याने तिने क्रॉसकोर्टचे फटके खेळण्यास सुरुवात केली. त्यामुळे सिंधूची दमछाक उडाली आणि याचाच फायदा उचलून ओकुहाराने दुसरा गेम २१-१५ असा जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.

निर्णायक तिसऱ्या गेमच्या सुरुवातीला दोन्ही खेळाडूंत कडवी झुंज पहावयास मिळाली. परंतु दडपणाखाली केलेल्या क्षुल्लक चुकांचा फटका सिंधूला या वेळीही महागात पडला. मध्यंतराला ओकुहाराने ११-५ अशी भक्कम आघाडी घेतली. मध्यंतरानंतरही तिने सिंधूला डोके वर काढण्याची अधिक संधी न देता २०-१३ अशी आघाडी मिळवली आणि जमिनीलगत स्मॅश लगावून विजयावर मोहोर उमटवली.

दरम्यान महिला दुहेरीत जपानच्या मिसाकी मात्सुटोमो आणि अयाका ताकाहाशी यांनी जागतिक क्रमवारीत २९व्या स्थानी असलेल्या अश्विनी-सिक्की यांना २१-१३, २१-१४ अशी सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. हा सामना ३८ मिनिटे रंगला.

सिंधूने ओकुहाराविरुद्ध स्वीकारलेला हा आठवा पराभव ठरला. दोघींमध्ये झालेल्या १७ सामन्यांपैकी नऊ सामन्यांत सिंधूने विजय मिळवला आहे.

यंदाच्या वर्षांत आतापर्यंत झालेल्या तीन स्पर्धापैकी एकदाही सिंधूला उपांत्य फेरी गाठता आली नाही. मलेशिया आणि इंडोनेशिया स्पर्धेत तिला अनुक्रमे उपांत्यपूर्व आणि उपउपांत्यपूर्व सामन्यात पराभव पत्करावा लागला.