धनंजय रिसोडकर – response.lokprabha@expressindia.com

बॅडमिंटनचा जागतिक विजेता हा बॅडमिंटन महासंघाच्या जागतिक स्पर्धेत ठरवला जात असला तरी ‘ऑल इंग्लंड बॅडिमटन’ या सर्वात जुन्या स्पर्धेतील विजेत्याला अशीच स्वतंत्र प्रतिष्ठा लाभते. भारताला हा मान आजवर दोनच वेळा मिळाला आहे.

क्रिकेटमध्ये जे स्थान माहात्म्य लॉर्ड्सचे आहे, टेनिसमध्ये जे महत्त्व विम्बल्डन या नावाला आहे. जगभरातील विश्वविद्यालयांमध्ये जे स्थान केम्ब्रिज आणि ऑक्सफर्डचे आहे, काहीसे तेच स्थान बॅडमिंटनमध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपला आहे. या श्रेष्ठतेच्या परंपरेला आपण योगायोग म्हणू शकत नाही. ब्रिटिशांनी त्यांच्या अनेक बाबींचे माहात्म्य कायम राहावे, यासाठी शतके उलटली तरी तेथील दर्जा कायम राखला आहे. त्याचा त्यांना रास्त अभिमानदेखील आहे. किंबहुना, साहेबाचे हे वैशिष्टय़च त्यांच्याकडील अनेक परंपरा अव्याहतपणे कायम राहण्यास कारणीभूत ठरले आहे. तर अशा या साहेबी वैशिष्टय़ असलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंना पुन्हा एकदा यशाने हुलकावणी दिली. भारताच्या सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांत या दोघांनाही दुर्दैवाने उपांत्यपूर्व फेरीतच बॅडमिंटनमधील अग्रमानांकित ताय त्झू यिंग आणि केंटो मोमोटा या दोन्ही अव्वल खेळाडूंचा सामना करावा लागला. तिथेच भारताच्या आशाअपेक्षांवर पाणी फेरले गेले. खरे तर या स्पर्धेतील विजेतेपद हे वैयक्तिक असल्याने ते त्या खेळाडूंच्या नावावर जमा होते. पण ब्रिटिशांशी निगडित काहीही असले की आपल्याला देशाचे स्मरण होणे अगदी साहजिक असते. त्यामुळेच सायना आणि श्रीकांत यांचे आव्हान संपुष्टात आल्यावर भारत पुन्हा एकदा ऑल इंग्लंडच्या विजयापासून वंचित राहिल्याची आणि काहीशी चुटपूट लागल्याची भावना बॅडमिंटनप्रेमींमध्ये निर्माण झाली.

ऑल इंग्लंडचे आणि भारताचे नाते अत्यंत जुने म्हणजे अगदी नेमके सांगायचे तर भारत ब्रिटिशांच्या जोखडाखालून मुक्त झाला त्या १९४७ सालापासूनचे आहे. भारताच्या प्रकाश नाथ यांना त्या वर्षी डेन्मार्कच्या कोन्नी जेप्सनकडून पराभव पत्करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर भारतीय बॅडमिंटनपटू ऑल इंग्लंडच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचायला तब्बल ३३ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. भारताचे पहिले सुपरस्टार बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी १९८० साली ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकून त्या करंडकाला भारतीय टिळा लावला. पण ही प्रतीक्षा खूपच प्रदीर्घ होती. १९८१ साली पदुकोण पुन्हा ऑल इंग्लंडच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले, मात्र सलग दुसऱ्या वर्षी ऑल इंग्लंडचे विजेतेपद मिळवण्याचे भाग्य त्यांना लाभले नाही. इंडोनेशियाच्या ज्या लिम स्वी किंगला पराभूत करून पदुकोण यांनी गतवर्षी विजेतेपद मिळवले होते, त्याच्याचकडून पराभूत व्हावे लागल्याने त्यांना ऑल इंग्लंडच्या दुसऱ्या यशाने हुलकावणी दिली. त्यामुळे या स्पर्धेचे एकमेव विजेतेपदच त्यांच्या नावावर जमा झाले. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीचाच हा पहिला सर्वात मोठा विजय होता. (१९८३ चा एकदिवसीय विश्वचषक हा भारताचा त्यानंतरचा सर्वात मोठे विजेतेपद असले तरी ते सांघिक होते.)

पदुकोण निवृत्त झाल्यानंतर तर भारताला ऑल इंग्लंडचे स्वप्नदेखील पडेनासे झाले. वर्षांमागून वर्ष गेली तरी कुणीही भारतीय ऑल इंग्लंडमध्ये झळकण्याचे नावच नव्हते. तब्बल दोन दशकांचा कालावधी उलटून गेला, आणि २००१ साली अचानकपणे पुलेला गोपीचंद हे नाव थेट फायनलपर्यंत जाऊन धडकले. गोपीचंदने चीनच्या चेन हॉँगला पराभूत करीत ऑल इंग्लंडचे विजेतेपद दुसऱ्यांदा भारतीय खेळाडूच्या नावे केले. तेव्हापासून भारतीय खेळाडूदेखील ही स्पर्धा जिंकू शकतात, अशी आशा भारतीय खेळाडूंच्या मनात निर्माण झाली. त्या एका मोठय़ा यशाने गोपीचंद हा एका रात्रीतून भारतीय क्रीडा क्षेत्राचा तारा म्हणून चमकू लागला. पण ही दोन्ही विजेतेपदे या दोन्ही खेळाडूंनी आपल्या वैयक्तिक प्रतिभेवर आणि क्षमतेवर मिळवली होती.

नवीन सहस्रकात केवळ प्रतिभेच्या आणि कौशल्याच्या जोरावर विजेतेपद मिळवणे तितकेसे शक्य नाही, हे लक्षात घेऊन पदुकोण यांनी बेंगळुरुमध्ये, तर गोपीचंद यांनी हैदराबादमध्ये बॅडमिंटन अकादमी स्थापन करण्यात पुढाकार घेतला. गोपीचंद यांच्या अकादमीत एकापाठोपाठ एक गुणी खेळाडू विदेशातील विविध स्पर्धामध्ये चमकू लागले. त्यातील सर्वाधिक देदीप्यमन नाव अर्थातच सायना नेहवाल हेच होते. सायना ही एकामागोमाग एक स्पर्धा जिंकू लागली. २०१२ साली सायनाच्या नावावर लंडन ऑलिम्पिकचे कांस्यपदकदेखील जमा झाले. त्यामुळे सायना ऑल इंग्लंडची दावेदारदेखील मानली जाऊ लागली. मजल-दरमजल करीत सायना २०१५ सालच्या ऑल इंग्लंडच्या अंतिम सामन्यापर्यंतदेखील पोहोचली. मात्र, स्पेनच्या कॅरोलिना मरिनने सायनाचे स्वप्न साकार होऊ दिले नाही. सायना ऐन बहरात असतानादेखील तिला त्यानंतर एकदाही उपांत्य फेरीच्या आसपास मजल मारता आली नाही. २०१६ साली सिंधूने ऑलिम्पिकचे उपविजेतेपद पटकावल्यापासून तिच्याकडून तसेच २०१७ साली पाच सुपरसीरिजचे अजिंक्यपद पटकावलेल्या श्रीकांतकडून भारतीय बॅडमिंटनप्रेमींना आशा वाटत होत्या; पण अन्य सर्व सुपरसीरिजचे अजिंक्यपद पटकावूनदेखील एकही भारतीय बॅडमिंटनपटू ऑल इंग्लंडच्या विजेतेपदापर्यंत पोहोचू शकला नव्हता. अखेरीस वर्षभर पुरस्काराच्या दृष्टीने दुष्काळी गेल्यानंतर सिंधूने वर्ल्ड टूर बॅडमिंटन फायनल्सचे विजेतेपद पटकावल्यावर गुरू गोपीचंद यांना काहीशी आशा वाटू लागली. त्यामुळे त्यांनी २०१८ च्या समारोपालाच पुढील वर्षी ऑल इंग्लंडचे विजेतेपद हे भारतीय खेळाडूंचे मुख्य लक्ष्य असायला हवे, असे सूतोवाच केले. साक्षात गुरूंनीच ध्येय निश्चित करून दिल्यावर ऑल इंग्लंड सर्व खेळाडूंनी त्यानुसार त्यांचे वर्षभराचे नियोजन केले. मात्र, गुरूच्या त्या अपेक्षाचा दबावदेखील खेळाडूंवर पडला असल्यास त्यात काही नवल नव्हते. तुमच्यातील क्षमता ओळखून एखादा गुरू तुमच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा बाळगत असेल, तर ती पूर्ण करण्यात शिष्यांनादेखील अवर्णनीय आनंद मिळत असतो. त्यानुसार सायनापासून सिंधूपर्यंत आणि श्रीकांतपासून समीर वर्मापर्यंत प्रत्येकानेच यंदाच्या त्यांच्या वार्षिक नियोजनाची आखणीच ऑल इंग्लंडच्या समावेशासह केली होती. मात्र, सिंधू आणि समीर पहिल्याच फेरीत, तर सायना आणि श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारून आव्हान संपुष्टात आल्याने माघारी फिरले. श्रीकांतचा पराभव विशेष क्लेशदायक होता, कारण गोपीचंद यांना सर्वाधिक अपेक्षा या सिंधू आणि श्रीकांतकडूनच होत्या, पण ते शक्य झाले नाही. ‘कभी कभी’च्या भाषेत बोलायचे झाल्यास ‘पर ये हो न सका, और अब ये आलम है..!’ की आता पुढील वर्षी होणाऱ्या ऑल इंग्लंडची प्रतीक्षा करणेच त्यांच्या हातात आहे.

महत्त्वामागील मीमांसा

ऑल इंग्लंड ही स्पर्धा अन्य सर्व सुपरसीरिज स्पर्धाप्रमाणेच मानली जाते. १८९९ साली प्रारंभ झाल्यानंतर १९४९ पासून १९७७ पर्यंत या स्पर्धेलाच बॅडमिंटनची जागतिक स्पर्धा मानले जात होते. त्यामुळे या स्पर्धेचा विजेता हाच जागतिक विजेता म्हणून ओळखला जात असे. मात्र, १९७७ नंतर जागतिक बॅडमिंटन महासंघाने स्वत:ची स्वतंत्र जागतिक स्पर्धा भरवण्यास प्रारंभ केला. तरीदेखील या स्पर्धेला आजही जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचाच मान आहे.

सर्वाधिक अजिंक्यपदांचा विक्रम

पुरुषांमध्ये ऑल इंग्लंडची सर्वाधिक अजिंक्यपदे इंडोनेशियाच्या रुडी हारतोनो यांच्या नावे आहे. त्यांनी तब्बल ८ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते, तर इंग्लंडच्या इथेल लारकोम्बे या महिलेने तर तब्बल ११ वेळा ऑल इंग्लंडचे विजेतेपद मिळवले होते. विशेष म्हणजे तिने गत शतकाच्या प्रारंभी टेनिसमध्ये विम्बल्डनचे विजेतेपददेखील पटकावले होते.
सौजन्य – लोकप्रभा