ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा

विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूवर बुधवारपासून सुरू होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताची भिस्त असेल. स्विस खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवातून सावरत जेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी ती उत्सुक आहे. २०१९च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर तिला एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही.

स्विस खुल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तीन वेळा विश्वविजेत्या कॅरोलिना मरिनसमोर सिंधूने एकतर्फी हार पत्करली. संपूर्ण स्पर्धेत वर्चस्वपूर्ण खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या सिंधूने मरिनविरुद्ध झगडताना आढळली. मरिनने ऑल इंग्लंड स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. याशिवाय मातब्बर चीन, कोरिया आणि चायनीज तैपेईच्या बॅडमिंटनपटूंनी या ‘सुपर १०००’ दर्जाच्या स्पर्धेतून टोक्या ऑलिम्पिक पात्रतेचा भाग नसल्यामुळे माघार घेतली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या दर्जाला यंदा धक्का बसला असला तरी १९ सदस्यीय भारतीय पथकाच्या पदकाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आतापर्यंत महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण (१९८०) आणि मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद (२००१) या दोनच भारतीयांना ऑल इंग्लंडचे जेतेपद जिंकता आले आहे.

एके काळी जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अग्रस्थानावर असणाऱ्या सायना नेहवालने २०१५मध्ये उपविजेतेपद पटकावले होते, तर सिंधूने २०१८मध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. परंतु याहून उत्तम कामगिरी कोणत्याही भारतीय खेळाडूला साकारता आली नव्हती.

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधू जेतेपदासाठी कडवी दावेदार मानली जात आहे. गेल्या दोन वर्षांत दोन स्पर्धांमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या सायनाकडून माफक अपेक्षाच केल्या जात आहेत. पाचव्या मानांकित सिंधूची पहिली लढत मलेशियाच्या सोनिया चीहशी होणार आहे, तर उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकानी यामागुचीशी तिची गाठ पडेल. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाचा पहिल्या फेरीत सातव्या मानांकित डेन्मार्कच्या मिआ ब्लिशफेल्डशी सामना होणार आहे.

पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतकडूनच भारताच्या पदकाच्या प्रमुख आशा आहेत. श्रीकांतची पहिली लढत इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तोशी असेल, तर जागतिक कांस्यपदक विजेत्या बी. साईप्रणितला फ्रान्सच्या टॉमा ज्युनियर पुपोव्हशी भिडावे लागेल.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या पारुपल्ली कश्यपची पहिली लढत जागतिक क्रमवारीत अग्रक्रमांकावर असलेल्या केंटो मोमोटाशी होईल. एच. एस. प्रणॉयचा पहिला सामना मलेशियाच्या डॅरेन लीवशी, तर समीर वर्माचा वायगॉर कोएल्होशी होणार आहे.

* वेळ : दुपारी २.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स ३, स्टार स्पोर्ट्स २ एचडी

सात्त्विक-चिरागवर दुहेरीची मदार

पुरुष दुहेरीत जागतिक पुरुष दुहेरी क्रमवारीत सध्या १०व्या स्थानावर असलेल्या सात्त्विक साईराज रन्कीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्यावर भारताची मदार असेल. स्वीस खुल्या स्पर्धेत दिमाखदार कामगिरी बजावणाऱ्या सात्त्विक-चिराग जोडीला पहिल्याच सामन्यात फ्रान्सच्या ईलॉय अ‍ॅडम आणि ज्युलियन मायोशी सामना करावा लागणार आहे. मिश्र दुहेरीत सात्त्विक आणि अश्विनी  पोनप्पा जोडीची पहिली लढत जपानच्या युकी कॅनीको आणि मिसाकी मॅटसुटोमोशी होणार आहे. एम. आर. अर्जुन आणि धु्रव कपिला जोडीची मलेशियाच्या ओंग येव सिन आणि तेओ ई यि जोडीशी सलामी असेल. महिला दुहेरीत राष्ट्रकुल कांस्यपदक विजेत्या अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी जोडीची पहिल्याच सामन्यात थायलंडच्या बेनयापा एम्सार्ड आणि नुंटाकर्न एम्सार्ड जोडीशी मुकाबला करायचा आहे. पूर्विश राम आणि मेघना जे. तसेच अश्विनी भट आणि शिखा गौतम जोडीसुद्धा आपल्या आव्हानांसाठी सज्ज झाल्या आहेत.