ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा

युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेत प्रथमच पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मुसंडी मारली आहे. याचप्रमाणे विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूनेही शानदार विजयासह आगेकूच केली आहे. एच. एस. प्रणॉय आणि बी. साईप्रणितचे आव्हान मात्र संपुष्टात आले.

२०१९मध्ये पाच विजेतेपदे जिंकणाऱ्या अल्मोराच्या १९ वर्षीय लक्ष्यने फ्रान्सच्या थॉमस रॉक्सेलचा २१-१८, २१-१६ असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या जपानच्या केंटो मोमोटापुढे प्रणॉयचा निभाव लागला नाही. गतवर्षी झालेल्या रस्ते अपघातानंतर डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागलेल्या मोमोटाने प्रणॉयचा ४८ मिनिटांत २१-१५, २१-१४ असा पराभव केला. डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनने साईप्रणितला १५-२१, २१-१२, २१-१२ असे पराभूत केले. याचप्रमाणे महिला एकेरीत सिंधूने फक्त २५ मिनिटांत डेन्मार्कच्या लिने ख्रिस्टोफरसेनचा २१-८, २१-८ असा पाडाव केला. सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या तिसऱ्या मानांकित अकानी यामागुचीशी गाठ पडणार आहे.

मिश्र दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पाची वाटचाल खंडित झाली. जपानच्या युकी कॅनेको आणि मिसाकी मॅटसुटोमो जोडीने पहिल्याच फेरीत सात्त्विक-अश्विनीचा २१-१९, २१-९ असा पराभव केला. डेन्मार्कच्या रासमुस ईस्परसेन आणि ख्रिस्टिन बुश जोडीने प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी जोडीचा २१-१५, २१-१७ असा पराभव केला.

 

दुखापतीमुळे सायना स्पर्धेबाहेर

दुखापतीमुळे सायना नेहवालला ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत माघार घ्यावी लागली. उजव्या मांडीला दुखापत झाल्यामुळे सायनाला सलामीचा सामनाच अर्धवट सोडावा लागला. बुधवारी रात्री डेन्मार्कच्या मिया ब्लिशफेल्ड या सातव्या मानांकित खेळाडूविरुद्धच्या लढतीत ८-२१, ४-१० अशा फरकाने ती पिछाडीवर होती.