सायनाच्या ऑलिम्पिक पात्रतेच्या आशा धुसर; लक्ष्यचे आव्हान संपुष्टात

रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने गुरुवारी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत कोरियाच्या सुंग जी ह्य़ुनवर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सायना नेहवालला मात्र पहिल्याच फेरीत पराभूत झाल्याने तिच्या ऑलिम्पिक पात्रतेच्या आशा धुसर झाल्या आहेत, तर लक्ष्य सेनचेही आव्हान संपुष्टात आले आहे.

जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या सिंधूने ४९ मिनिटे लांबलेल्या या सामन्यात ह्य़ुनवर २१-१९, २१-१५ असा सरळ दोन गेममध्ये विजय मिळवला. उपांत्यपूर्व सामन्यात सिंधूपुढे नोझोमी ओकुहारा अथवा होज्मार्क जेरफेल्ड यांच्यातील विजेतीचे आव्हान असेल.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीने सायनाला अवघ्या २८ मिनिटांत २१-११, २१-८ अशी सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. तिच्या पराभवामुळे महिला एकेरीत आता फक्त पी. व्ही. सिंधूवरच भारताचे भवितव्य अवलंबून आहे.

सायना जागतिक क्रमवारीत २०व्या क्रमांकावर असून अव्वल १६ खेळाडूंनाच ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवता येणार आहे. त्यामुळे लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनापुढे २८ एप्रिलपर्यंत कामगिरी सुधारण्याची संधी आहे.

पुरुष एकेरीतील ४५ मिनिटे रंगलेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसनने १८ वर्षीय लक्ष्यला २१-१७, २१-१८ असे पराभूत केले. लक्ष्यच्या पराभवामुळे भारताचे पुरुष एकेरीतील आव्हान समाप्त झाले आहे.

पारुपल्ली कश्यपला पहिल्या लढतीत पराभव पत्करावा लागला. हिरेन रुस्ताविटोविरुद्धची लढत सुरू होऊन अवघा एक मिनिट झालेला असतानाच ०-३ अशा पिछाडीवर असणाऱ्या कश्यपने माघार घेतली. परंतु पराभवानंतर त्याने आरोग्यमंत्री आणि बॅडमिंटन महासंघाला उद्देशून ‘ट्विटर’वर केलेल्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. किदम्बी श्रीकांत आणि बी. साईप्रणीत यांना बुधवारी पहिल्याच लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले.