All England Championships: भारताची फुलराणी सायना नेहवाल हिने या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली. सायनाने पहिल्या फेरीत स्कॉटलंडच्या कर्स्टी गिलमर हिचा २१-१७, २१-१८ अशा दोन सरळ गेममध्ये पराभव केला. दोनही गेममध्ये सायनाला गिलमरने कडवी झुंज दिली. पण सायनाच्या अनुभवापुढे गिलमरची चपळता फिकी पडली. पहिल्या गेममध्ये ४ गुणांच्या तर दुसऱ्या गेममध्ये ३ गुणांच्या फरकाने सायनाने गिलमरला पराभूत केले. दुसऱ्या फेरीत सायनाची झुंज डेन्मार्कच्या लाईन जाएर्सफेल्ड (Line Kjaersfeldt) हिच्याशी होणार आहे.

याबाबत बोलताना सायना म्हणाली की कडवी झुंज देणाऱ्या खेळाडूंबरोबर खेळायला कायम मजा येते. ज्यावेळी प्रत्येकालाच विजेतेपद हवे असते, तेव्हा सारेच प्राण पणाला लावून खेळतात आणि स्पर्धा अधिक चुरशीची होती. अशा वेळी तुम्हाला तुमच्या नैसर्गिक खेळाकडे लक्ष देणे आवश्यक असते. पण स्वतःवर दडपण देण्यात काहीही अर्थ नसतो. कारण जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला मिळणारच.

दुसरीकडे पहिल्या फेरीत भारताचा समीर वर्मा याला मात्र हार पत्करावी लागली. डॅनिश बॅडमिंटनपटू व्हिक्टर अक्सल्सन याने त्याला २१-१६, १८-२१, १४-२१ असे पराभूत केले. याशिवाय पी व्ही सिंधूला दक्षिण कोरियाच्या संग जी ह्युन हिने १६-२१, २२-२०, १८-२१ नमवले. साई प्रणितने प्रणॉयला २१-१९, २१-१९ असे पराभूत केले. तर दुहेरीमध्ये अश्विनी पोनप्पा – सिक्की रेड्डी जोडीला जपानच्या जोडीकडून हार पत्करावी लागली.