मणिपूरच्या पालकांना माजी खेळाडूकडून आर्थिक मदत, तर महाराष्ट्रातील जाधव कुटुंबीयांचा रेल्वेने प्रवास

कुमार विश्वचषकात खेळणाऱ्या फुटबॉलपटूंच्या पालकांच्या आयोजनाची आम्ही व्यवस्था करू, त्यांना विमानाचे तिकीटही देऊ, हे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) आश्वासन हवेतच विरल्याचे चित्र दिसत आहे. काही फुटबॉलपटूंच्या पालकांनी एआयएफएफच्या विमान तिकीटांची लाट पाहिली, पण स्पर्धा तोंडावर आली असताना एआयएफएफने त्यांच्या विमान प्रवासाची कोणतीही व्यवस्था केली नाही. महाराष्ट्रातील फुटबॉलपटूच्या पालकांना रेल्वेने प्रवास करावा लागला आहे. त्यामुळे फुटबॉलपटूंच्या पालकांच्या व्यवस्थेचा एआयएफएफने ‘फुटबॉल’ केला अशी चर्चा क्रीडा क्षेत्रात होत आहे.

मणिपूरच्या आठ खेळाडूंची घरची परिस्थिती हलाखीची आहे आणि त्यामुळे त्यांना विमानाचे तिकीट खरेदी करणे परवडणारे नाही. महासंघाच्या घोषणेनंतर आपल्या मुलांना खेळताना प्रत्यक्ष पाहण्याचे त्यांचे स्वप्न साकार होईल असे वाटत होते. मात्र, त्यांच्यापर्यंत महासंघाची मदत पोहोचली नसल्याचे बोलले जात आहे. भारताचा माजी फुटबॉलपटू रेनेडी सिंगने मित्रपरिवारांकडून आर्थिक निधी गोळा करत खेळाडूंच्या पालकांना विमान तिकीट मिळवून दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

भारतीय संघात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनिकेत जाधवच्या कुटुंबीयांना काहीसा असाच अनुभव आला. नवी दिल्लीला जाण्याची तयारी त्यांनी आधीच केली होती. त्यांनी निझामुद्दीन एक्स्प्रेसचे आगाऊ तिकीट खरेदीही केले होते. पण महासंघाच्या घोषणेनंतर विमानाने प्रवास करण्यासाठी कुटुंबीय उत्सुक होते. मात्र सोमवारी मध्यरात्रीपर्यंत त्यांना महासंघाकडून विमान तिकीट न मिळाल्याने त्यांना कोल्हापूर ते दिल्ली प्रवास रेल्वेने करावा लागला. बुधवारी सायंकाळी ते नवी दिल्लीत दाखल होतील. विमानाचे तिकीट न मिळाल्याबद्दल त्यांनी कोणतीही नाराजी व्यक्त केलेली नाही. मात्र, या दोन उदाहरणातून महासंघाकडून योग्य समन्वय साधला जात नसल्याचे उघडकीस आले आहे.

दरम्यान, रेनेडी यांच्याकडून केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या दाव्यावर महासंघाच्या एका पदाधिकाऱ्याने नाराजी व्यक्त केली. मणिपूरच्या खेळाडूंच्या पालकांना आणि जाधव कुटुंबीयांना विमानाचे तिकीट आम्ही पाठवले आहे. जाधव कुटुंबीयांनी आगाऊ बुकिंग केल्यामुळे ते कदाचीत रेल्वेने येत असतील. पण आमच्याकडून खेळाडूंच्या पालकांची सर्व सोय केली जात आहे, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले. त्याच वेळी त्यांनी गोव्यात गतवर्षी झालेल्या एएफसी १६ वर्षांखालील स्पध्रेचा दाखला दिला. ते म्हणाले, ‘गोव्यात अंतिम लढतीच्या वेळी आम्ही खेळाडूंच्या कुटुंबीयांचा सर्व खर्च केला होता. त्या स्पध्रेला खर्च करू शकतो मग फिफाच्या स्पध्रेला का नाही?’