17 December 2018

News Flash

युवा खेळाडूंच्या संघाचे आय-लीगमध्ये पदार्पण

१७ व १९ वर्षांखालील भारतीय संघातील खेळाडूंचा ‘इंडियन अ‍ॅरोज’ क्लब

आय-लीगमधील यंदाच्या हंगामात १७ व १९ वर्षांखालील भारतीय संघातील खेळाडूंचा एकत्रित संघ खेळणार असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ८ ऑक्टोबर २०१७ च्या अंकात प्रसिद्ध केले होते.

१७ व १९ वर्षांखालील भारतीय संघातील खेळाडूंचा ‘इंडियन अ‍ॅरोज’ क्लब

फिफा कुमार (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंच्या भविष्याच्या दृष्टीने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) तयार केलेला आराखडा मंगळवारी प्रत्यक्षात उतरवण्यात आला.

मंगळवारी आय-लीगच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आणि त्यात कुमार व युवा खेळाडूंचा संयुक्त संघ म्हणून ‘इंडियन अ‍ॅरोज’ आय-लीगमध्ये पदार्पण करत असल्याचे जाहीर करण्यात आले. ही लीग २५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे आणि मिनेव्‍‌र्हा पंजाब एफसी विरुद्ध मोहन बगान असा उद्घाटनीय सामना लुधियाना येथे खेळवण्यात येणार आहे.

कुमार फुटबॉलपटू आणि १९ वर्षांखालील राष्ट्रीय संघातील खेळाडूंचा मिळून एक क्लब आय-लीग स्पर्धेत खेळणार असल्याचा निर्णय विश्वचषक स्पर्धेदरम्यान घेण्यात आला होता.

यंदा आय-लीग आणि इंडियन सुपर लीग (आयएसएल) समांतर खेळवण्यात येणार आहे. गतविजेत्या बेंगळूरु एफसीने आयएसएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे आय-लीगची क्लबसंख्या कमी झाली होती. त्यात अन्य दोन क्लबनी माघार घेतल्याने आय-लीगसमोरील अडचणीही वाढल्या. मात्र, आय-लीगच्या यंदाच्या हंगामात तीन नवीन क्लबने पदार्पण केले आहे. त्यामध्ये इंडियन अ‍ॅरोज क्लबसह गोकुलम केरला आणि मणिपूरचा नेरोका एफसी यांचा समावेश आहे.

इंडियन अ‍ॅरोज आपला पहिला सामना चेन्नई सिटी एफसीविरुद्ध खेळणार असला तरी एआयएफएफने सामन्याची तारीख व स्थळ अजून जाहीर केलेले नाही. गतविजेता एझॉल एफसी जेतेपद राखण्याच्या शर्यतीची सुरुवात २८ नोव्हेंबरला ईस्ट बंगालविरुद्ध करणार आहे. गोकुलाम केरळ आणि नेरोका एफसी यांना पहिल्याच लढतीत अनुक्रमे शिलाँग लाजाँग आणि मिनेव्‍‌र्हा पंजाब यांचा सामना करावा लागणार आहे.

 

First Published on November 15, 2017 2:36 am

Web Title: all india football federation i league