सुकाहारा स्पोर्ट्स अकादमी (चेंबूर) आणि श्री समर्थ व्यायाम मंदिर (दादर) यांनी मुंबई महापौर चषक अखिल भारतीय निमंत्रित मल्लखांब स्पध्रेत अनुक्रमे पुरुष व महिला विभागात सांघिक जेतेपद पटकावले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारतीय मल्लखांब महासंघ आणि महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेच्या मान्यतेखाली मुंबई शहर जिल्हा मल्लखांब संघटनेने या स्पध्रेचे आयोजन केले होते.
दादर येथील श्री समर्थ व्यायाम मंदिर येथे वातानुकूलित सभागृहात पार पडलेल्या या स्पध्रेत पुरुष गटात सागर ओव्हाळकर, सोहेल शेख, रतन प्रसाद, हसन अन्सारी यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर सुकाहारा स्पोर्ट्स अकादमीने २४.१५ गुणांची करत बाजी मारली. कांदिवलीच्या समता क्रीडा भवन (२३.९५) आणि दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिर (२३.७०) यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. समता क्रीडा भवन संघात दीपक शिंदे, संदीप काळे, ध्रुव पाटलेकर व गौरीश साळगावकर यांचा समावेश होता, तर श्री समर्थ संघात सागर राणे, केवल पाटील, शंतनू लोहार व हितेश सनगले हे खेळाडू होते.
महिला विभागात श्री समर्थ व्यायाम मंदिरने २३.८५ गुणांची कमाई केली. आशिका सुर्वे, हिमानी परब, अदिती करंबेळकर व ऋतुजा तांबोळी यांचा विजयात सिंहाचा वाटा आहे. सातारा जिल्हा मल्लखांब संघटनेला (२३.७५) दुसरे, तर पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेला (२२.६५) तिसरे स्थान मिळाले. प्रतीक्षा मोरे, वर्षां मोरे, निकिता यादव, पूजा मोरे यांनी सातारासाठी, तर अनिशा मिजार, सानिका नागगौडा, दर्शिता पवार, अपूर्वा शिंदे यांनी पुण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या स्पध्रेत प्रथमच मुलींसाठी पुरलेल्या मल्लखांबावरील स्पर्धा घेण्यात आल्या. एकूण २२ मुलींनी सहभाग घेतलेल्या स्पध्रेत समर्थच्या अरिफा अल्माझ खान व अदिती करंबेळकर यांनी पहिले, हिमानी परबने दुसरे आणि राजमुद्रा लोकेने तिसरे स्थान पटकावले.

वैयक्तिक गटातील विजेते
पुरुष : १. अक्षय तरल (श्री पार्लेश्वर), २. दीपक शिंदे (समता), ३. अभिषेक देवल (बोरिवली)
महिला : १. प्रतीक्षा मोरे (सातारा), २. आशिका सुर्वे (श्री समर्थ), ३. हिमानी परब (श्री समर्थ).