उत्कृष्ट सांघिक खेळ करीत यजमान महाराष्ट्राने दिल्ली संघावर २-१ असा विजय मिळवीत सबज्युनिअर मुलींच्या राष्ट्रीय ‘अ’ श्रेणी हॉकी स्पर्धेत शानदार सलामी केली.  शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत चंदिगढ संघाने आसामचा १८-० असा धुव्वा उडविला. त्या वेळी त्यांच्या सरोजकुमारी हिने दोन हॅटट्रिकसह अकरा गोल केले. अन्य लढतीत ओडिशा संघाने गोलांचा पाऊस पाडताना बंगालची ३०-० अशी धूळधाण उडविली. गतवेळच्या उपविजेत्या झारखंड संघाने उत्तर प्रदेशला ७-० असे पराभूत केले.
महाराष्ट्राने बलाढय़ दिल्ली संघावर ०-१ अशा पिछाडीवरून २-१ अशी मात केली. दिल्लीची खेळाडू सरिता तिवारी हिने १२व्या मिनिटाला फिल्डगोल करीत संघाचे खाते उघडले. तथापि २८व्या मिनिटाला महाराष्ट्राला गोल करण्याची हुकमी संधी प्राप्त झाली. त्यांच्या योगेश्वरी वाडेकर हिने जोरदार चाल करीत गोल केला व १-१ अशी बरोबरी साधली. पूर्वार्धात १-१ अशी बरोबरी होती. उत्तरार्धात सामन्याच्या ६०व्या मिनिटाला महाराष्ट्राच्या प्राजक्ता किदगावकर हिने सुरेख गोल करीत संघास आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी कायम ठेवत महाराष्ट्राने सामना जिंकला.
ओडिशा संघाने बंगालविरुद्ध तीस गोल नोंदविले, त्याचे श्रेय एलिमा मिंझ (दहा गोल), मरियाना कुजुर (आठ गोल), सरोजिनी एक्का (सहा गोल) यांच्या आक्रमक खेळास द्यावे लागेल. अशिम कांचन बार्ला हिने तीन गोल करीत त्यांना चांगली साथ दिली. चंदिगढ संघाने आसामविरुद्ध निर्विवाद वर्चस्व गाजविले. त्या वेळी त्यांच्याकडून सरोजकुमारी हिने अकरा गोल तर मनीषाकुमार हिने तीन गोल केले.
झारखंड संघास उत्तर प्रदेशविरुद्ध ७-० असा विजय मिळवताना फारशी अडचण आली नाही. त्यांच्या प्रमिला सोरेन हिने तीन गोल करीत महत्त्वाचा वाटा उचलला.