नंदुरबार म्हटले की बाप रे.. कुठे आले हे ठिकाण?.. अशी भावना राज्यातल्या दूरवर पसरलेल्या जिल्ह्य़ातल्या मंडळींची होते. नंदुरबार म्हणजे ग्रामीण भाग असाही समज आहे. मात्र या प्रतिक्रियांचा, टोमण्यांचा विचार न करता नंदुरबार जिल्हा खो-खो संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खेळाला केंद्रस्थानी ठेवून एक स्वप्न बघितले. नंदुरबार शहरात पुरुष-महिला तसेच किशोर-किशोरी अशा व्याप्तीची स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करण्याचे हे स्वप्न त्यांनी जोपासले होते. भाई नेरूरकर सुवर्णचषक आमंत्रितांच्या अखिल भारतीय खो-खो स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले.
नंदुरबार जिल्हा खो-खो संघटनेचा आतापर्यंतचा प्रवास संघटनेचे सचिव राजेश सोनावणे आणि खजिनदार मनोज परदेशी यांनी उलगडला. ‘‘१९९९-२००० मध्ये नंदुरबार जिल्हा खो-खो संघटनेची स्थापना झाली. सुरुवातीला पहिल्या २० संघांमध्ये स्थान मिळायचे, पिछाडीवर राहावे लागत असल्याचे दु:ख असे. मात्र २००५नंतर हेही चित्र बदलले. शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि शालेय, महाविद्यालयीन स्तरावरच्या खेळाडूंना टिपून त्यांना जिल्ह्य़ासाठी खेळविण्याला दिलेले प्राधान्य याचा परिणाम दिसून येऊ लागला. प्रतिष्ठित स्पर्धाच्या अव्वल आठमध्ये नंदुरबारचा संघ दिसू लागला. खेळाडूंच्या घडणीबरोबर स्पर्धा आयोजनाचे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न सुरू केला,’’ असे सोनावणे यांनी सांगितले. परदेशी म्हणाले, ‘‘शहाद्यामध्ये राज्यस्तरीय सबज्युनिअर गटाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी आणि याच परिसरातून राज्याच्या पटलावर गेलेले राज्याचे क्रीडा मंत्री पद्याकर वळवी यांच्या सहकार्यामुळे स्पर्धा आयोजनाचे धाडस करू शकले. सर्व खेळाडू, पंच-सामनाधिकारी यांची निवास-खानपानाची व्यवस्था करण्यात आली असून, महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे.’’
आदिवासी बहुल या जिल्ह्य़ातल्या खेळाडूंना काटक शरीराचे वरदान लाभले आहे मात्र तांत्रिक मुद्यांमध्ये ते थोडे पिछाडीवर पडत असल्याची खंत या दोघांनी बोलून दाखवली. या स्पर्धेच्या आयोजनामुळे आत्मविश्वास मिळाला असून, यापुढे दरवर्षी अशा स्वरूपाची मोठी स्पर्धा आयोजित करण्याचा मानस असल्याचे सोनावणे यांनी सांगितले.