फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेवर अधिराज्य गाजवणाऱ्या राफेल नदालला यंदा सहावे मानांकन देण्यात आले आहे. या स्पर्धेच्या मुख्य फेरीला सोमवारी प्रारंभ होत असून नोव्हाक जोकोव्हिच व सेरेना विल्यम्स यांना अनुक्रमे पुरुष व महिलांच्या गटात अव्वल मानांकन देण्यात आले आहे.
नदालला यंदा अपेक्षेइतकी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. जोकोव्हिचने यंदाच्या मोसमात पाच स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याने फ्रेंच खुल्या स्पर्धेत आतापर्यंत २२ सामने जिंकले आहेत. नदाल व जोकोव्हिच यांच्यात उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडण्याची शक्यता आहे. ३३ वर्षीय खेळाडू रॉजर फेडररला यंदा द्वितीय मानांकन मिळाले आहे. मियामी मास्टर्स स्पर्धेत नदाल याच्यावर मात करणाऱ्या अँडी मरेला तिसरे मानांकन लाभले आहे. दरम्यान, जागतिक क्रमवारीतील सहावा मानांकित मिलोस राओनिकने पायाच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे.
कारकीर्दीतील २०वे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सेरेनाला तुलनेत सोपी वाटचाल करता येणार आहे. गतवर्षी या स्पध्रेत अजिंक्यपद मिळविणाऱ्या मारिया शारापोव्हाला पहिल्या
फेरीत इस्तोनियाच्या काया कानेपीशी खेळावे लागणार आहे. स्लोएनी स्टीफन्सपुढे व्हीनस विल्यम्सचे आव्हान असणार आहे. रुमानियाची सिमोनी हॅलेपला तिसरे मानांकन मिळाले आहे.