एकता कौशिक हिने दोन हॅट्ट्रिकसह नऊ गोल नोंदविले, त्यामुळेच हरयाणास सबज्युनिअर मुलींच्या राष्ट्रीय ‘अ’ श्रेणी हॉकी स्पर्धेस राजस्थानवर १५-० असा दणदणीत विजय मिळविता आला.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सोमवारपासून सुरू झालेल्या लढतीत आंध्रप्रदेशनेही मोठा विजय मिळविला. त्यांनी केरळ संघास १५-० अशी धूळ चारली. मध्य प्रदेश संघासही छत्तीसगढविरुद्ध ६-० असा विजय मिळविताना अडचण आली नाही.
राजस्थानविरुद्धच्या लढतीत पूर्वार्धात हरयाणाने ९-० अशी भक्कम आघाडी घेतली होती. एकता हिने दोन वेळा हॅट्ट्रिक नोंदविताना नऊ गोल केले. तिने दाखविलेले ड्रिबलिंगचे कौशल्य तसेच गोल नोंदविण्याची अचूकता कौतुकास्पद होते. ज्योतीकुमारी व भारती सरोहा यांनी प्रत्येकी दोन गोल करीत तिला चांगली साथ दिली.
आंध्र प्रदेशने केरळविरुद्धच्या लढतीत प्रारंभापासूनच निर्विवाद वर्चस्व गाजवित पूर्वार्धात ७-० अशी आघाडी मिळविली होती. भारती थाटीचेरिया हिने चार गोल केले तर तारांगिनी बडुलुप्पी व नलिनी जेनी यांनी प्रत्येकी तीन गोल केले. महालक्ष्मी अकुला हिने दोन गोल नोंदविले.
मध्य प्रदेशविरुद्ध सुरुवातीला छत्तीसगढ संघाने संघर्षपूर्ण खेळ केला. त्यामुळेच पूर्वार्धात मध्यप्रदेशला केवळ एक गोलच्या आधारेच १-० अशी आघाडी मिळविता आली. उत्तरार्धात त्यांच्या खेळाडूंनी वेगवान खेळ केला. ज्योती पाल हिने हॅट्ट्रिक करीत महत्त्वाचा वाटा उचलला. उपसानासिंग, नीलु दादिया व इशिना चौधरी यांनी प्रत्येकी एक गोल करीत संघाच्या विजयास हातभार लावला. या स्पर्धेचे उद्घाटन माजी ऑलिम्पिकपटू धनराज पिल्ले यांच्या हस्ते झाले.