करोनाच्या पार्श्वभूमीवर टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेसाठी तयारी करणाऱ्या खेळाडूंव्यतिरिक्त सर्व राष्ट्रीय शिबिरे पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) सर्व खेळाडूंना त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी दिले आहेत.

राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र आणि ‘साइ’च्या केंद्रांमधील सराव तातडीने स्थगित करण्यात आला आहे. टोक्यो ऑलिम्पिक वगळता सर्व राष्ट्रीय शिबिरे पुढे ढकलण्यात आली आहेत, असे रिजिजू यांनी ‘ट्विटर’वर म्हटले आहे. हे पाऊल तात्पुरते असले तरी सावधगिरी म्हणून उचलण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

कोणत्याही क्रीडा स्पर्धा, कार्यक्रम, चर्चासत्र आणि कार्यशाळा केंद्राच्या किंवा राज्याच्या परवानगीशिवाय घेता येणार नाहीत. खेळाडूंची निवासव्यवस्था गैरसोय होऊ नये म्हणून २० मार्चपर्यंत उपलब्ध असेल.