ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या वेगवान युगातही कसोटी क्रिकेटची नजाकत अजून टिकून आहे, याचा प्रत्यय जोहान्सबर्गच्या पहिल्या कसोटी सामन्याने क्रिकेटजगताला दिला. जागतिक कसोटी क्रमवारीतील अग्रस्थानावरील दक्षिण आफ्रिका आणि दुसऱ्या स्थानावरील भारत यांच्यातील रोमहर्षक कसोटीचा थरार अखेरच्या षटकापर्यंत उत्कंठा टिकवणारा होता. आता दरबानला होणाऱ्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही संघांनी दंड थोपटले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू खेळाडू जॅक्स कॅलिसच्या कारकीर्दीतील ही अखेरची कसोटी आहे. या सर्व गोष्टींमुळे बुधवारपासून सुरू होणारी कसोटी ही ‘दरबान-ए-खास’ आहे.
पहिल्या कसोटी सामन्याअखेरीस दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी फक्त ८ धावा कमी पडल्या. अन्यथा दक्षिण आफ्रिकेच्या खात्यावर एका अविस्मरणीय विजयाची नोंद झाली असती. भारताने या कसोटी सामन्यावर पहिले चार दिवस दबदबा राखला, मात्र अखेरच्या दिवशी ही पकड निसटली. किंग्समेडवरील ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यानेच या मालिकेचा निर्णय लागेल. मैदानावरील रंगतदार लढतीप्रमाणेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळ यांच्यातील मैदानाबाहेरील राजकीय कुरघोडीनाटय़ानेही या मालिकेला खमंग फोडणी दिली. या छोटेखानी दौऱ्यातून दोन्ही संघांनी नेमके काय मिळवले, हे खेळाडूंना सांगता येणार नाही. परंतु क्रिकेटरसिक, पुरस्कर्ते, प्रसारणकर्ते यांचा विचार न करता आपल्या स्वार्थी मग्रूरतेचे या क्रिकेटमंडळांनी यथार्थ दर्शन घडवले.
दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवरील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत यजमानांनी २-० असे निर्विवाद प्रभुत्व सिद्ध केले. कारण भारतीय संघाला पुरेशी सरावाची संधी मिळाली नाही. देशातील कसोटी मालिका संपताच भारताने दक्षिण आफ्रिकेकडे प्रयाण केले. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या निवृत्तीनंतर भारतीय संघासाठी अग्निपरीक्षेचे खरे दिवस सुरू झाले. परंतु सचिनच्या रिक्त जागी विराट कोहलीने बस्तान बांधले. वाँडर्सवर सर्वानाच आश्चर्याचा धक्का देत या दौऱ्यावरील भारताचे पहिले शतक झळकले. भारतीय वेगवान गोलंदाजांनीही दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टीचा वेग आत्मसात केला. त्यामुळेच पहिल्या कसोटीत एक तोलामोलाची लढत पाहायला मिळाली आणि तो सामना अनिर्णीत राहिला.
तिसरा एकदिवसीय सामना आणि त्यानंतरचा एक सराव सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर आता भारतीय फलंदाजांना कोणता चेंडू सोडायचा आणि कोणत्या चेंडूवर धावा काढायच्या, हे कळून चुकले आहे. याचप्रमाणे योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याचे कसब झहीर खानच्या मार्गदर्शनाखाली भारतीय गोलंदाजांना ज्ञात झाले आहे.
पहिल्या कसोटी सामन्यातील अखेरचा तासाभराचा खेळ हा नाटय़मय घटनांनी युक्त होता. फॅफ डय़ू प्लेसिस आणि ए बी डी व्हिलियर्स यांची जोडी फुटली आणि दक्षिण आफ्रिकेसाठी समीकरण कठीण होत गेले. त्यामुळे ऐतिहासिक विजय मिळवण्याची संधी साधण्याऐवजी कसोटी अनिर्णीत राखण्याचा बचावात्मक निर्णय तळाच्या फलंदाजांना घ्यावा लागला. आता कसोटी मालिकेवर वर्चस्व निर्माण करून भारताला निरोप देण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.
जोहान्सबर्ग कसोटीत भारताचा ऑफ-स्पिनर आर. अश्विनची झोळी दोन्ही डावांत रिकामी होती. परंतु दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरच्या खात्यावर मात्र दोन बळी जमा होते. दुसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्याऐवजी डावखुरा फिरकी गोलंदाज रॉबिन पीटरसनला संघात स्थान मिळू शकेल. याचप्रमाणे दुखापतग्रस्त मॉर्नी मॉर्केलच्या तंदुरुस्तीबाबत दक्षिण आफ्रिकेचा संघ चिंताग्रस्त आहे. जर मॉर्केल खेळू शकला नाही तर त्याची जागा वेगवान गोलंदाज कायले अ‍ॅबोट घेऊ शकेल.
*  संघ – दक्षिण आफ्रिका : ग्रॅमी स्मिथ (कर्णधार), ए बी डी व्हिलियर्स, हशिम अमला, जे पी डय़ुमिनी, फॅफ डय़ू प्लेसिस, डीन एल्गर, इम्रान ताहिर, जॅक्स कॅलिस, रॉरी क्लेनव्हेल्ट, मॉर्नी मॉर्केल, अल्विरो पीटरसन, रॉबिन पीटरसन, व्हर्नन फिलँडर, डेल स्टेन, थामी त्सोलेकिले (यष्टीरक्षक), कायले अ‍ॅबोट.
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, प्रग्यान ओझा, झहीर खान, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक).
*  सामन्याची वेळ : दुपारी २ वाजल्यापासून.
*  थेट प्रक्षेपण : टेन क्रिकेट वाहिनीवर.