भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराज सिंगने सोशल मीडियावर एक जुना फोटो पोस्ट केला आहे. अठरा वर्षांपूर्वीचा हा फोटो युवीसाठी खास आहे. १८ वर्षांपूर्वी झालेल्या त्या सामन्यात युवराजने दमदार खेळी करत ३५८ धावांचा डोंगर रचला होता. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये युवराजच्या हाताच एक चषक दिसत असून त्याच्या चेहऱ्यावर विजयाची भाव स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत.

युवराजने पोस्ट केलेला हा फोटो आणखी एका कारणमुळे खास आहे. १९९९ मध्ये पार पडलेल्या कूच बेहर चषकाच्या वेळचा हा फोटो असून, त्याच्या या खेळीचा उल्लेख ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटातही करण्यात आला होता. धोनीच्याच नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या बिहारच्या संघाविरोधात युवी हा सामना खेळला होता. त्यावेळी धोनीच्या संघाने पहिल्या सत्रात १४२.३ षटकांमध्ये सर्वबाद ३५७ धावा केल्या होत्या. त्यावेळी ‘माहि’ने ८४ धावा केल्या होत्या. धोनीच्या संघाचे हे आव्हान परतवून लावताना पंजाबने २२२ षटकांमध्ये पाच गड्यांच्या मोबदल्यात ८३९ धावा केल्या होत्या.

https://www.instagram.com/p/Bc5BpDLhoW6/

वाचा : बिल गेट्सनाही भावला ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’

या सामन्यात सर्वाधिक लक्षवेधी बाब ठरली होती, ती म्हणजे युवराजने केलेली फटकेबाजी. धोनीच्या संपूर्ण संघाच्या धावांपेक्षाही युवी एका धावेने पुढे होता. बिहारचा संघ ३५७ धावांवर बाद झाला होता. त्याचवेळी युवीने ३५८ धावांचा डोंगर रचत सर्वांनाच थक्क केले होते. युवीच्या या तुफानी खेळीमध्ये ४० चौकार आणि ६ षटकांरांचा समावेश होता. या सामन्यानंतर १९ वर्षांखालील भारतीय संघाची निवड प्रक्रिया झाली होती. त्यामुळे युवीने आपली कामगिरी चांगली होण्यासाठी सुरूवातीला सावध खेळ केला होता. त्याने १०० धावा होईपर्यंत एकही षटकार मारला नव्हता.