ऑल स्टार्स क्रिकेट टी -२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात वॉर्न वॉरियर्सने सचिन ब्लास्टर्सवर विजय मिळवत मालिका ३-०  ने जिंकली आहे. सचिन ब्लास्टर्सने विजयासाठी ठेवलेले २२० धावांचे आव्हान वॉर्न वॉरियर्सच्या संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत चार गडी राखून विजय मिळविला.
ऑल स्टार्स क्रिकेट टी – २० मालिकेतील तिसरा व अंतिम सामना अमेरिकेतील लॉस एंजेल्समध्ये रंगला. सचिन तेंडुलकरच्या सचिन ब्लास्टर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सचिन व सेहवाग या सलामीच्या जोडीने संघाला दमदार अर्धशतकी सुरुवात करुन दिली. सेहवाग २७ धावांवर बाद झाल्यावर सचिनने धडाकेबाज खेळी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. सचिन ५६ धावांवर बाद झाल्यावर जयवर्धनेने १८ चेंडूत ४१ तर गांगुलीने ३७ चेंडूत ५० धावांची खेळी केली. तर हूपरने २२ चेंडूत ३३ धावांची खेळी केली. सचिन ब्लास्टर्सने २० षटकांत ५ विकेट गमावत २१९ धावा केल्या. वॉर्न वॉरियर्सतर्फे व्हिटोरीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. सचिन ब्लास्टर्सच्या आव्हानाला उत्तर देण्यास आलेल्या वॉर्नच्या संघाची सुरवात खराब झाली होती. ऍम्ब्रॉसच्या पहिल्याच चेंडूवर मायकेल वॉन त्रिफळाबाद झाला. मात्र, हेडन आणि सायमंड्स यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला विजयाच्या मार्गावर नेले. पण, सायमंड्स आणि हेडन एकापाठोपाठ बाद झाल्याने वॉर्नचा संघ अडचणीत आला. अखेर पहिल्या दोन सामन्यांत विजयी खेळी करणाऱ्या कुमार संगकारा (४२), रिकी पाँटींग (४३) आणि जॅक कॅलीस ( ४७ ) यांच्या खेळीमुळे वॉर्नच्या संघाला २२० धावांचे सहजरित्या पार करता आले.