भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत याच्यासह ३६ आरोपींची आयपीएलच्या सहाव्या हंगामातील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणातून दिल्ली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सध्या जामिनावर असलेले आयपीएलमधील खेळाडू अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांनाही निर्दोष ठरवण्यात आले असून, दाऊद इब्राहिम आणि त्याचा साथीदार छोटा शकील यांना दोषी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
जामिनावर असलेल्या ३६ आरोपींवरील आरोपपत्रांबाबत शनिवारी हा निकाल देण्यात आला. सर्वाची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश नीना बन्सल कृष्णा यांनी निकाल देताना सांगितले. निकाल घोषित होताच ३२ वर्षीय श्रीशांतला रडू कोसळले, तर अन्य खेळाडूंनी न्यायालयात एकमेकांना आलिंगन देत आपला आनंद साजरा केला. २३ मे रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने २५ जुलै ही आरोपपत्र दाखल करण्याची तारीख निश्चित केली होती. दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने ४२ आरोपींवर आरोपपत्र दाखल केले होते. यापैकी सहा जणांना फरार घोषित करण्यात आले.
दाऊद आणि शकील यांची मुंबईत मालमत्ता आहे. मात्र १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेच्या खटल्याशी त्यांचा संबंध असल्यामुळे ते त्यानंतर भारतात फिरकलेले नाहीत, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. मुंबईत दाऊदची डोंगरीला, तर शकीलची नागपाडय़ाला मालमत्ता आहे. न्यायालयाने याआधीच दाऊद आणि शकील यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. याशिवाय पाकिस्तानस्थित जावेद चुटानी, सलमान ऊर्फ मास्टर आणि एहतेशाम हे दाऊदचे हस्तक या खटल्यात आरोपी आहेत.
या खटल्यातील ४२ आरोपींवर पोलिसांनी सहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. याचप्रमाणे पुरवणी आरोपपत्रसुद्धा नंतर दाखल करण्यात आले होते. ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करताना पुरेसे पुरावे न मिळाल्यामुळे श्रीशांत, चव्हाण आणि अन्य आरोपींना न्यायालयाने जामीन दिला होता. चंडिला यालासुद्धा न्यायालयाने नंतर जामीन दिला होता. भारतातील आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजीवर दाऊद आणि शकील यांचे नियंत्रण असल्याचा दावा पोलिसांनी आरोपपत्रात केला आहे.
घटनाक्रम

> १६ मे २०१३ : राजस्थान रॉयल्सचे खेळाडू एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना दिल्ली पोलिसांकडून अटक
> २८ मे २०१३ : या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आयपीएलच्या प्रशासकीय परिषदेने चौकशी समिती नियुक्त केली.
> २ जून २०१३ : एन. श्रीनिवासन यांच्याकडून तात्पुरत्या स्वरूपात बीसीसीआयचे अध्यक्षपद काढून घेतले.
> ११ जून २०१३ : श्रीशांत व चव्हाण यांना जामीन मंजूर
> ३० जुलै २०१३ : भारतातील क्रिकेटमधील फिक्सिंग आणि सट्टेबाजीवर नियंत्रण ठेवणाऱ्या दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्यावर दिल्ली पोलिसांचे आरोपपत्र दाखल.
> ९ सप्टेंबर २०१३ : अजित चंडिला याला जामीन मंजूर. अन्य आरोपींनाही जामीन मंजूर.
> १८ नोव्हेंबर २०१३ : या प्रकरणी दिल्ली पोलिसांचे पुरवणी आरोपपत्र दाखल.
> ३१ मे २०१४ : दाऊद व अन्य आरोपींच्या मुंबईतील मालमत्तांची दिल्ली पोलिसांकडून न्यायालयात माहिती.
> ३० सप्टेंबर २०१४ : दाऊद आणि छोटा शकील फरारी आरोपी म्हणून दिल्ली न्यायालयाकडून घोषित.
> २३ मे २०१५ : आरोपपत्रांबाबतचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला.
> २५ जुलै २०१५ : ३६ आरोपींची निर्दोष मुक्तता.