भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर दुहेरी हितसंबंधांबाबत लावण्यात आलेले आरोप हे हास्यास्पद आणि बिनबुडाचे आहेत, अशी टीका कॉर्नरस्टोन व्हेंचर्स कंपनीचे मालक बंटी साजदेह यांनी केली आहे.

‘‘कोहली आणि कॉर्नरस्टोन कंपनीबाबत जी तक्रार करण्यात आली आहे, ती पूर्णपणे हास्यास्पद आहे. कोहलीची प्रतिष्ठा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. जाणूनबुजून कोहलीच्या नावाला संजीव गुप्ता यांच्याकडून धक्का पोहोचवण्यात येत आहे. तर्कवितर्कावर आधारित हे आरोप करण्यात येत आहेत. कोहली आमच्या कंपनीशी अन्य खेळाडूंप्रमाणेच करारबद्ध खेळाडू आहे. त्याच्यासह अन्य क्रिकेटपटूंचे व्यावसायिक करार आम्ही पाहतो. मात्र तिसरी व्यक्ती कोणतेही कारण नसताना चुकीचे आरोप करत आहे,’’ असे साजदेह यांनी स्पष्ट केले. ‘‘कोणत्याही निष्कर्षांवर येऊन आरोप करण्यापूर्वी गुप्ता यांनी सत्यता पडताळावी. आम्ही आमचा व्यवसाय पारदर्शकपणे करतो. सर्व प्रकारचे व्यवहार हे कागदोपत्री असतात आणि संबंधित प्रशासनाकडून तपासण्यात आलेले असतात,’’ असेही साजदेह यांनी सांगितले.

मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे आजीवन सदस्य संजीव गुप्ता यांनी कोहलीविरोधात दोन पदे भूषवत असल्यासंबंधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) तक्रार दाखल केली होती. कोहली हा भारताच्या क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवत असताना कॉर्नरस्टोन व्हेंचर्स कंपनी आणि विराट कोहली स्पोर्ट्स एलएलपीमध्येही साजदेह यांच्यासोबत संचालक आहे, असा आरोप गुप्ता यांनी केला होता. ही कंपनी कोहलीचे व्यावसायिक करार पाहते आणि अन्य क्रिकेपटूंनाही मिळवून देत असते, असे गुप्ता यांनी म्हटले होते. कोहलीने याप्रकारे ‘बीसीसीआय’च्या कलम ३८ (४) चा भंग केला असल्याचा आरोपही गुप्ता यांनी तक्रारीत केला आहे.

गुप्ता यांनी यापूर्वी दुहेरी हितसंबंधांप्रकरणी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, सौरव गांगुली, कपिल देव यांच्यावरही आरोप केले होते. त्यावेळीदेखील आताप्रमाणे ‘बीसीसीआय’कडून ही प्रकरणे हाताळण्यासाठी निती अधिकारी डी. के. जैन यांना नियुक्त करण्यात आले होते.