भारताचा विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी लहानपणापासून भारतीय लष्करातील जवानांपासून प्रभावित झाला होता, आपण मोठे होऊन त्यांच्यासारखेच देशाचे रक्षण करायचे, हे त्याने मनोमन ठरवलेही होते. पण नियतीचा खेळ काही निराळाच असतो. नियतीने असा काही खेळ खेळला की धोनी लष्करातील जवान न होता क्रिकेटपटू झाला.
‘‘लहानपणापासूनच मला लष्करात भरती व्हायला हवं असं वाटत होतं. कारण त्यावेळी लष्करातील जवान बघून त्यांच्याबद्दल हेवा वाटायचा आणि आपणही मोठे झाल्यावर जवानच व्हायचं, असं मला वाटायचं.’’ असं धोनीने एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. या वृत्तवाहिनीने धोनीची रांची येथील पॅराशुट रेजिमेंट येथे मुलाखत घेतली होती. यावेळी धोनीने जवानांसह त्यांच्या कुटुंबियांशीही संवाद साधला. त्यांच्याबरोबर छायाचित्रे काढत त्यांना आपल्या स्वाक्षरींची भेटही दिली.
धोनी भारताचा सर्वोत्तम कर्णधार असल्याचे मत काही जाणकारांनी व्यक्त केले आहे. कारण धोनीने भारताला २०११ साली विश्वचषक, त्यापूर्वी ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स करंडकही जिंकवून दिला आहे. एवढय़ा उंचीवर पोहोचल्यावरही कशाचीही भीती वाटत नाही आणि याचे कारण लष्कराचा गणवेश असल्याचे धोनी सांगतो.
‘‘लष्कराचा गणवेश हा खासच आहे, त्यामध्ये काय जादू आहे माहिती नाही, पण तो गणवेश परिधान करावा, असं नेहमी वाटत असतं,’’ असं धोनी म्हणाला.
या मुलाखतीमध्ये धोनीने या प्रश्नांना आपल्या खास शैलीत मिश्कील उत्तरेही दिली. या मुलाखतीमध्ये ‘‘तुझे काम हे फार तणावाचे आहे, त्यामध्येही तू नेहमी शांत कसा राहतो,’’ असा प्रश्न विचारला होता. यावर धोनी म्हणाला की, ‘‘पत्रकार परिषदेच्या एक दिवस अगोदर मी ‘फ्रीज’मध्ये जाऊन बसतो, त्यामुळेच मी शांत राहू शकतो.’’