क्रिकेटच्या जगतात ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंह धोनी तितकाच हजरजबाबी असल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. मॅचविनर आणि बेस्ट फिनिशर अशी ओळख असलेल्या धोनीवर वाढते वय आणि ‘फार्म’ हरवल्याची टीका होत आहे. पण याच टीकेला त्यानं वेस्टइंडिजविरुद्धच्या सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी करून जबरदस्त उत्तर दिलं आहे. त्यावर आपण जुन्या वाइनसारखे आहोत. जसजशी वेळ निघून जाते, तसतशी तिची चव आणखीनच वाढते, असं त्यानं म्हटलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीनं ७९ चेंडूंत ७८ धावा कुटल्या. त्यामुळंच भारतानं वेस्ट इंडिजसमोर आव्हान उभं केलं.

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातील आघाडीचे तीन फलंदाज सातत्यपूर्ण चांगल्या धावा करत आहेत. त्यामुळं मधल्या फळीतील खेळाडूंना चांगलं प्रदर्शन करण्याची खूपच कमी संधी मिळते. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात धोनीला फलंदाजीची संधी मिळाली. या संधीचं सोनं करण्यात यशस्वी झाल्याचा आनंद स्पष्टपणे धोनीच्या चेहऱ्यावर दिसत होता. वाढत्या वयाबरोबरच कसा परिपूर्ण खेळाडू होत आहे, या प्रश्नावर त्यानं ‘हे म्हणजे जुन्या वाइनसारखं आहे.’ असं हजरजबाबी उत्तर दिलं. दीड वर्षापासून संघातील आघाडीचे फलंदाज चांगली फलंदाजी करत आहेत. अशात खूप कमी संधी मिळते. पण ती मिळाल्यानंतर चांगला खेळ करता आला, याचा आनंद आहे, असंही धोनी म्हणाला. धवन, कोहली आणि युवराज बाद झाल्यानंतर चांगली भागिदारी करणं आवश्यक होतं. संघाला २५० धावांपर्यंत नेण्याचं लक्ष्य होतं आणि आम्ही ते केलं. केदार जाधवनं अखेरपर्यंत साथ दिली. त्यानंही अखेरच्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली, असं कौतुकही त्यानं केलं.

धोनीची कमाल!

धोनी आता भारताकडून एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. त्यानं मोहम्मद अझहरुद्दीनला मागे टाकलं आहे. अझहरुद्दीननं ३३४ सामन्यांमध्ये ३०८ डावांत ९३७८ धावा केल्या होत्या.
धोनीनं आतापर्यंत २९४ सामन्यांत २५४ डावांत ५१.३१ च्या सरासरीनं ९४४२ धावा केल्या आहेत. सचिन, गांगुली आणि द्रविडनंतर तो चौथ्या स्थानी आहे.