भारतीय संघात विश्वचषकासाठी चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज फलंदाजीसाठी येणार यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. मात्र भारतीय संघाचा माजी फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मणच्या मते अंबाती रायुडू चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी योग्य उमेदवार आहे. याचसोबत गेल्या काही सामन्यांत त्याने केलेली कामगिरी पाहता विश्वचषकासाठी रायुडूचं संघातलं स्थान पक्क असल्याचंही लक्ष्मण म्हणाला.

“गेल्या काही सामन्यांमध्ये अंबाती रायुडूने चांगली फलंदाजी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या वन-डे सामन्यात त्याने फटकेबाजी करत आपलं संघातलं महत्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. या खेळीमुळे विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघातली जागा निश्चीत आहे.” दुबईत एका खासगी कार्यक्रमात बोलत असताना लक्ष्मणने आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – विश्वचषकासाठी चौथ्या क्रमांकावर धोनी योग्य पर्याय – सुरेश रैना

याचसोबत लक्ष्मणने धोनीने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा सल्ला दिला आहे. पाचव्या क्रमांकावर येऊन धोनी डावाला स्थैर्य देऊ शकतो. संघात हार्दिक पांड्या, केदार जाधवसारखे फलंदाज असताना अखेरच्या षटकात ते फटकेबाजी करु शकतात, असंही लक्ष्मण म्हणाला. 24 फेब्रुवारीपासून भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 टी-20 आणि 5 वन-डे सामन्याची मालिका खेळणार आहे.

अवश्य वाचा – अबब ! एकाच डावात 23 षटकार, विंडीजच्या फलंदाजांची विक्रमी खेळी