मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडू आणि वेगवान गोलंदाज मोहित शर्मा यांनी नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत लक्षवेधी भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यामुळे आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लिलावासाठीच्या खेळाडूंच्या यादीत या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
लिलावाकरिता उपलब्ध खेळाडूंच्या यादीत समावेशाकरिता खेळाडूने किमान एखादा आंतरराष्ट्रीय सामना खेळणे बंधनकारक आहे. रायुडूने आयपीएलच्या चार हंगामांमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु भारताचे प्रतिनिधित्व केले नसल्यामुळे स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या या फलंदाजाला यंदा फक्त ३० लाख रुपयेच पदरी पडले. रायुडू झिम्बाब्वेविरुद्धच्या चार एकदिवसीय सामन्यांत खेळला.  आयपीएलच्या सहाव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून चमकदार कामगिरी दाखविणाऱ्या मोहित शर्माने दोन सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. मोहित मागील दोन प्रथम श्रेणी हंगामांमध्ये खेळला आहे, पण भारताचे प्रतिनिधित्व न केल्याचे यंदा त्याला २० लाख रुपये मिळाले.
पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या सातव्या हंगामाकरिता नव्याने लिलाव प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे मोहित आणि रायुडू त्यासाठी उपलब्ध असेल. भारतीय संघात समावेशासाठी परवेझ रसूलसुद्धा उत्सुक आहे. त्याला आगामी काळात पदार्पण करता आल्या तोसुद्धा लिलावाद्वारे चांगली रक्कम प्राप्त करू शकेल. आगामी काळात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर मालिकेसाठी येत आहे.