२०१९च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत पराभूत व्हावं लागलं. या स्पर्धेसाठी संघ जाहीर केल्यापासूनच निवड समितीवर टीका सुरू झाली होती. भारतीय संघात चौथ्या क्रमांकाचा वाद सुरू असताना संघात ऋषभ पंत, अंबाती रायडूला वगळण्यात आलं आणि अवघ्या चार-पाच सामन्यांचा अनुभव असलेल्या विजय शंकरला संधी देण्यात आली. जवळपास वर्षभरातनंतर रायडूला संघात न घेण्याचं आणि संघ निवडीच्या वेळी काय चर्चा झाली ते तत्कालीने निवड समिती सदस्याने मुलाखतीत सांगितलं.

विजय शंकरपेक्षा अंबाती रायडू अनुभवी आणि प्रतिभावान होता असं अनेकांचं मत होतं, पण विजय शंकरच्या रूपाने अष्टपैलू खेळाडूला संघात स्थान देण्यात आले आहे असे निवड समितीकडून सांगण्यात आलं. त्यानंतर त्या समितीतील सदस्य असलेले गगन खोडा यांनी मुलाखतीत रायडूला वगळण्याचं कारण सांगितलं. “स्पर्धा इंग्लंडमध्ये असल्याने आम्हाला अगदीच तरूण खेळाडूला संघात स्थान द्यायचं नव्हतं. अंबाती रायडू अनुभवी होता. आम्ही त्याच्या खेळावर लक्ष ठेवून होते कारण तो विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघातील प्रबळ दावेदार होता. वर्षभर आम्ही त्याचा खेळ पाहत होतो. पण त्याच्या कामगिरीचा आलेख चढता नव्हता, तो सपाटच राहिला. विश्वचषक स्पर्धेत खेळण्याबद्दलचा आत्मविश्वास त्याच्यात दिसलाच नाही”, असे खोडा स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

दरम्यान, भारतीय संघाचा फलंदाज आणि सध्या IPLमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणारा अंबाती रायुडू नुकताच बाबा बनला. रविवारी अंबातीच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या ट्विटर हँडलवरुन ही गोड बातमी दिली.