भारतीय संघाचा मधल्या फळीतला फलंदाज अंबाती रायुडूने कसोटी व रणजी क्रिकेट स्पर्धेमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला लिहीलेल्या पत्रात रायुडूने आपल्या निवृत्तीची घोषणा केली असून, यापुढे आपण केवळ वन-डे व टी-20 क्रिकेटकडे लक्ष केंद्रीत करणार असल्याचं रायुडूने म्हटलंय. 2013/14 साली भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड दौऱ्यात रायुडूची भारताच्या कसोटी संघात निवड करण्यात आली होती. मात्र या दौऱ्यांमध्ये त्याला संघात जागा मिळाली नाही, यानंतर रायुडू कसोटी संघात पुनरागमन करु शकला नाही.

मध्यंतरीच्या काळात रायुडूने आयसीएल या क्रिकेट लीगमध्ये सहभाग घेतला होता. यानंतर बीसीसीआयने रायुडूसह काही खेळाडूंवर निलंबनाची कारवाई केली. मात्र काही काळानंतर रायुडूने बीसीसीआयची माफी मागितल्यानंतर त्याला स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली. यानंतर बडोदा, विदर्भ आणि आंध्र प्रदेश या संघाकडून खेळताना रायुडूने भारतीय संघात आपलं स्थान मिळवलं. आपल्या पत्रात रायुडूने बीसीसीआय व सर्व क्रिकेट संघटनांचे आभार मानले आहेत. नुकत्याच झालेल्या आशिया चषक व विंडीजविरुद्ध मालिकेत रायुडूने धडाकेबाज कामगिरी करत आपली दखल सर्वांना घेणं भाग पाडलं होतं.