बंगळुरुत पार पडलेल्या निवड समितीच्या बैठकीत आज अफगाणिस्तान आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचं नेतृत्व पुन्हा एकदा विराट कोहलीकडे देण्यात आलेलं आहे. वन-डे संघात दोन वर्षांच्या अंतरानंतर अंबाती रायडूचं भारतीय संघात पुनरागमन झालेलं आहे. आयपीएलच्या अकराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणाऱ्या रायडूने फलंदाजीत आपली चमक दाखवली आहे. आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रायडूने पहिलं स्थान पटकावलं आहे. त्याच्या याच कामगिरीचा त्याला फायदा होताना दिसतो आहे.

रायडूसोबत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणाऱ्या लोकेश राहुललाही भारतीय वन-डे संघात जागा मिळाली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाकडून खेळताना राहुलची आक्रमक खेळी लक्षात घेऊन त्याला संघात जागा देण्यात आली आहे. याचसोबत मुळचा मुंबईकर असलेल्या आणि दिल्लीच्या संघाचं कर्णधारपद भूषविणाऱ्या श्रेयस अय्यरलाही वन-डे संघात जागा देण्यात आलेली आहे. याचसोबत गोलंदाजीत सनराईजर्स हैदराबाद संघाकडून आश्वासक कामगिरी करणाऱ्या सिद्धार्थ कौललाही भारतीय संघात स्थान मिळालं आहे.

इंग्लंडविरुद्ध ३ वन-डे सामन्यांसाठी भारताचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, अंबाती रायडू, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव</p>