रिओ दी जानिरो येथे आता ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा झाल्यास पदक तालिकेत अमेरिकेचेच वर्चस्व राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चीन व रशिया हे अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवण्याची शक्यता आहे.
क्रीडा सांख्यिकीतज्ज्ञ सिमोन ग्लिव्ह हे गेली चार वर्षे ऑलिम्पिकमधील संभाव्य खेळाडूंच्या कामगिरीचा बारकाईने अभ्यास करीत आहेत. त्यांच्या अंदाजानुसार अमेरिकेचा जलतरणपटू मायकेल फेल्प्स हा आपल्या नावावर आणखी पाच सुवर्णपदके व एक कांस्यपदक नोंदविण्याची शक्यता आहे. फेल्प्सने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये १८ सुवर्णपदकांसह २२ पदकांची कमाई केली आहे.
ग्लिव्ह यांचे आतापर्यंतचे अंदाज बरेचसे खरे ठरले आहेत. पुन्हा जून, जुलै व ऑगस्टमध्ये ते याबाबत अद्ययावत अंदाज घोषित करणार आहेत. ५ ऑगस्ट रोजी ऑलिम्पिक स्पर्धा होत असून त्यापूर्वी ते आपला अंदाज जाहीर करतील. त्यांच्या अंदाजानुसार अमेरिका ४२ सुवर्णपदकांसह १०२ पदके मिळविल तर चीनला ३१ सुवर्णपदकांसह ७८ पदकांची कमाई होईल. रशियाला २२ पदके मिळतील असा त्यांचा अंदाज आहे.
ग्लिव्ह यांनी जागतिक स्पर्धा, ग्रां.प्रि. स्पर्धा, ग्रँडस्लॅम स्पर्धा, तसेच आंतरखंडीय स्पर्धाच्या आधारे हे अंदाज तयार केले आहेत. रशियाच्या काही खेळाडूंवर उत्तेजक सेवनाबद्दल बंदी घातली असल्यामुळे या खेळाडूंना ऑलिम्पिकपासून वंचित
राहावे लागणार आहे. ग्लिव्ह यांनी रशियाच्या खेळाडूंबाबत अंदाज व्यक्त करताना या गोष्टीचाही आधार घेतला आहे.
ग्लिव्ह यांच्या अंदाजानुसार फेल्प्सला १०० व २०० मीटर बटरफ्लाय, २०० मीटर वैयक्तिक मिडले तसेच ४ बाय १०० मीटर मिडले रिले व ४ बाय २०० मीटर फ्रीस्टाईल रिले शर्यतीचे विजेतेपद मिळण्याची शक्यता आहे. ४ बाय १०० मीटर फ्रीस्टाईल रिले शर्यतीत त्याचा समावेश असलेल्या संघास कांस्यपदक मिळेल, असा अंदाज ग्लिव्ह यांनी व्यक्त केला आहे.