हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा

अमेरिकेच्या महिला संघाने हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत आइस हॉकीमधील २० वर्षांचा दुष्काळ संपवणारे ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले आहे.

आइस हॉकीमध्ये अमेरिकेने कट्टर प्रतिस्पर्धी कॅनडाचा पेनल्टीमध्ये ३-२ असा पराभव केला. कॅनडाच्या मेघान अ‍ॅगोस्टाचा निर्णायक प्रयत्न मैडी रुनीने हाणून पाडल्यानंतर अमेरिकेच्या महिला संघाने जल्लोष साजरा केला. या विजयासह अमेरिकेने सलग २४ ऑलिम्पिक विजयांची कॅनडाची मालिका खंडित केली. ऑलिम्पिक आणि विश्वचषक स्पर्धेतही कॅनडाची अमेरिकेविरुद्ध १२-११ अशी विजयी कामगिरी आहे.

रशियाचा अ‍ॅलेक्झांडर उत्तेजकप्रकरणी दोषी

उत्तेजक द्रव्य पदार्थाचे सेवन केल्याचे मान्य केल्यामुळे रशियाच्या खेळाडूचे कांस्यपदक परत घेण्यात आले.

रशियाच्या अ‍ॅलेक्झांडर कृशेलनित्स्कीला मिश्र दुहेरी कर्लिगमध्ये कांस्यपदक मिळाले होते; परंतु उत्तेजक चाचणीत मेल्डोनियमचे अंश आढळल्यामुळे तो दोषी सापडला. त्यामुळे त्याला आपले पदक गमवावे लागले. उत्तेजक प्रकरणात मोठय़ा प्रमाणात दोषी आढळल्यामुळे रशियावर बंदी घालण्यात आली होती; परंतु हिवाळी ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिकपणे सहभागी झालेल्या १६८ खेळाडूंमध्ये २५ वर्षीय अ‍ॅलेक्झांडरचा समावेश होता. ‘‘उत्तेजकविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचे खेळाडूने मान्य केले आहे. त्यामुळे मिश्र दुहेरी कर्लिग प्रकारातून त्याला अपात्र ठरवण्यात आले आहे,’’ असे क्रीडाविषयक लवादाने म्हटले आहे. रविवारी हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेचा समारोप सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी रशियाला आपला ध्वज फडकावता यावा, यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती त्यांच्यावरील बंदी उठवण्याच्या तयारीत होते. मात्र अ‍ॅलेक्झांडर प्रकरणामुळे पुन्हा रशिया क्रीडाक्षेत्र डागाळले आहे.