ओसाकाचे विजयी पुनरागमन; मरेचे आव्हान संपुष्टात

ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास आणि बेलारुसची आर्यना सबालेंका या मानांकित खेळाडूंना मंगळवारी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयारंभ करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. जपानच्या नाओमी ओसाकाने ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये यशस्वी पुनरागमन केले. मात्र ब्रिटनच्या माजी विजेत्या अँडी मरेला सलामीलाच गाशा गुंडाळावा लागला.

आर्थर अ‍ॅश स्टेडियमवर १०० टक्के प्रेक्षकांच्या साक्षीने झालेल्या पुरुष एकेरीतील लढतीत तिसऱ्या मानांकित त्सित्सिपासने मरेवर २-६, ७-६ (९-७), ३-६, ६-३, ६-४ अशी पाच सेटमध्ये सरशी साधली.

अन्य लढतींमध्ये, रशियाच्या दुसऱ्या मानांकित डॅनिल मेदवेदेवने रिचर्ड गॅस्क्वेटला ६-४, ६-३, ६-१ अशी धूळ चारली. स्पेनच्या १८व्या मानांकित रॉबटरे बॉटिस्टाने संतापलेल्या निक किर्गियोसवर ६-३, ६-४, ६-० असे वर्चस्व गाजवले. रशियाच्या पाचव्या मानांकित आंद्रे रुब्लेव्हने इव्हो कालरेव्हिचवर ६-३, ७-६ (७-३), ६-३ असा विजय मिळवला.

महिलांमध्ये दुसऱ्या मानांकित सबालेंकाने निना स्टोजॅनोव्हिचवर ६-४, ६-७ (४-७), ६-० अशी मात केली. तिसऱ्या मानांकित नाओमी ओसाकाने मेरी बौझकोव्हाला ६-४, ६-१ असे सहज पराभूत केले. जून महिन्यात फ्रेंच स्पर्धेतील पहिल्या फेरीतील विजयानंतर मानसिक आरोग्याशी निगडित समस्यांमुळे माघार घेणाऱ्या ओसाकाचा हा त्यानंतर पहिलाच ग्रँडस्लॅम विजय ठरला. प्रेक्षकांच्या पुनरागमनामुळे सामन्यात कधीही मी एकटीच लढत असल्याचे जाणवले नाही, असे ओसाका विजयानंतर म्हणाली. त्याशिवाय फ्रेंच विजेत्या बाबरेरा क्रेजिकोव्हाने अस्त्रा शर्माचा ६-०, ६-४ असा फडशा पाडला. अमेरिकेच्या किशोरवयीन कोको गॉफने मॅग्डा लिनेटला ५-७, ६-३, ६-४ असे नमवले.

 

त्सित्सिपासवर मरे नाराज

त्सित्सिपासने अनेकदा विश्रांतीसाठी वेळ खर्ची घालवल्याने चार तास, ४९ मिनिटांपर्यंत लांबलेल्या सामन्यात मरेने नाराजी प्रकट केली. ‘‘त्सित्सिपासविषयी माझ्या मनात किंचितही आदर शिल्लक नाही. सामना निर्णायक स्थितीत असताना त्याने अनेकदा विश्रांती घेत मला ताटकळत ठेवले,’’ असे मरे म्हणाला. परंतु त्सित्सिपासने मात्र मरेने लगावलेले आरोप फेटाळून लावत आपण कोणत्याही नियमांचा भंग न केल्याचे सांगितले.