रॅडूकानूचा पात्रता फेरीपासून जेतेपदापर्यंत ऐतिहासिक पल्ला

ब्रिटनची १८ वर्षीय टेनिसपटू एमा रॅडूकानू मागील महिन्यात अमेरिकेत दाखल झाली, त्यावेळी जागतिक क्रमवारीत ती १५०व्या स्थानावर होती. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पात्रता फेरीचा अडथळा ओलांडण्याची फारशी अपेक्षा नसल्याने घरी परतण्यासाठी तिने विमानाचे तिकीटही काढून ठेवले होते. मात्र, रॅडूकानूने केवळ पात्रता फेरीचा अडथळा सहज पार केला नाही, तर तिने अमेरिकन स्पर्धेचे ऐतिहासिक जेतेपद पटकावले.

१९९९नंतर पहिल्यांदाच दोन युवा खेळाडूंमध्ये झालेल्या अमेरिकन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात १८ वर्षीय रॅडूकानूने १९ वर्षीय लैला फर्नांडेझचा ६-४, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करत पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचे स्वप्न पूर्ण केले.

रॅडूकानू आणि फर्नांडेझ या युवतींनी धक्कादायक निकालांची नोंद करत अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, अंतिम सामन्यात रॅडूकानूला अधिक दर्जेदार खेळ करण्यात यश आले. तिने या लढतीचा पहिला सेट ६-४ असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये तिच्याकडे ५-३ अशी आघाडी होती आणि ती विजयासाठी सव्र्हिस करत होती. मात्र, त्याच वेळी तिच्या पायाला दुखापत झाल्याने तिने वैद्यकीय विश्रांती घेतली. ही बाब फर्नांडेझला फारशी आवडली नाही. अखेर रॅडूकानूने आपली सव्र्हिस राखत हा सेट जिंकला आणि पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचा आनंद साजरा केला. खुल्या स्पर्धांच्या युगात (१९६८ पासून) पात्रता फेरीपासून ग्रँडस्लॅम जेतेपदाचा पल्ला गाठणारी ‘नवतारका’ रॅडूकानू पहिलीच खेळाडू ठरली.

शारापोव्हा, सेरेनाच्या पंगतीत स्थान

रॅडूकानूने या जेतेपदासह मारिया शारापोव्हा आणि सेरेना विल्यम्स या बड्या खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवले. रॅडूकानू ही शारापोव्हानंतरची सर्वात युवा ग्रँडस्लॅम विजेती ठरली आहे. शारापोव्हाने वयाच्या १७व्या वर्षी विम्बल्डन (२००४) स्पर्धा जिंकली होती, तर अमेरिकन स्पर्धेत एकही सेट न गमावता जेतेपद पटकावणारी रॅडूकानू ही सेरेनानंतर (२०१४) अवघी दुसरी खेळाडू आहे.

अंतिम सामना जिंकू न शकल्याचे नक्कीच दु:ख आहे. मात्र, हा पराभव मला अधिक मेहनत घेण्यासाठी प्रेरित करेल. पुढील स्पर्धांमध्येही मी याच ईष्र्येने खेळणे आवश्यक आहे. या स्पर्धेतील कामगिरीमुळे माझ्यात खेळासह मानसिक आणि शारीरिकदृष्ट्याही खूप सुधारणा झाली आहे.       – लैला फर्नांडेझ

सॅलिसब्युरी-क्रावचेक मिश्र दुहेरीत अजिंक्य

जो सॅलिसब्युरी आणि डेसिरे क्रावचेक ही दुसरी मानांकित जोडी अमेरिकन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत अजिंक्य ठरली. अंतिम फेरीत या जोडीने बिगरमानांकित मार्सेलो अरेवालो आणि जिऊलिआना ऑल्मोसला ७-५, ६-२ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. त्याआधी सॅलिसब्युरीने राजीव रामच्या साथीने खेळताना पुरुष दुहेरीचेही जेतेपद पटकावले होते.

ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले, यावर विश्वासच बसत नाही. लहानपणी मी केवळ जिंकण्याचा आणि जिंकल्यानंतर आपल्या प्रशिक्षकांकडे धावत जाण्याचा विचार करायचे. मागील काही दिवस पुन्हा हेच विचार माझ्या डोक्यात होते. आता जेतेपदामुळे चाहत्यांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढतील, याचे मला दडपण वाटत नाही. मी केवळ १८ वर्षांची असून प्रत्येक विजयाचा आनंद उपभोगण्याचा प्रयत्न करत आहे.

– एमा रॅडूकानू