ऋषिकेश बामणे

चार प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम स्पर्धापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचा या वर्षीचा हंगाम नुकताच संपला. एकीकडे पुरुष एकेरीत मातब्बर खेळाडूंचेच वर्चस्व सिद्ध झालेले दिसताना महिलांमध्ये मात्र नवतारकेचा उदय झाला, तर भारतीय खेळाडूंची कामगिरी मात्र निराशाजनक झाली.

काळानुसार अनुभवी खेळाडूचा अस्त होऊन त्याच्याहून अधिक कौशल्यवान असा नवा तारा उगवतो, हे चित्र आपण अनेक खेळांत पाहिले आहे; परंतु ग्रँडस्लॅम स्पर्धाच्या पुरुष एकेरीसाठी तरी ही बाब लागू पडत नाही, असेच म्हणावे लागेल. स्पेनच्या ३३ वर्षीय राफेल नदालने अंतिम फेरीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवला पराभूत करून कारकीर्दीतील १९वे ग्रँडस्लॅम मिळवले. नदालनेच या वर्षी जूनमध्ये फ्रेंच स्पर्धेचे विजेतेपदसुद्धा मिळवले. नदालव्यतिरिक्त स्वित्र्झलडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांनीही वर्षभर चमकदार खेळ करून दाखवला. ३७ वर्षीय फेडररला या वर्षी ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवता आले नसले तरी विम्बल्डनच्या अंतिम फेरीत त्याने जोकोव्हिचला दिलेली कडवी झुंज डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. जोकोव्हिचने विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन स्पर्धाच्या जेतेपदावर नाव कोरून क्रमवारीतील अग्रस्थान अधिक भक्कम केले. या त्रिमूर्तीमधील सर्वाधिक अनुभवी फेडररने २००३ मध्ये कारकीर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जिंकले. त्यानंतर २०१९च्या अमेरिकन स्पर्धेपर्यंत एकूण ६६ ग्रँडस्लॅम स्पर्धा झाल्या असून यापैकी तब्बल ५५ ग्रँडस्लॅममध्ये या तिघांपैकीच एकाने सरशी साधली आहे. अविश्वसनीय गोष्ट म्हणजे गेल्या पाच वर्षांत फक्त दोनदाच अशी वेळ आली आहे की, या तिघांपैकी एकालाही अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. २०१४ मध्ये अमेरिकन स्पर्धेत केई निशिकोरी विरुद्ध मरिन चिलिच, तर २०१६ मध्ये विम्बल्डन स्पर्धेत अँडी मरे विरुद्ध मिलोस राओनिक यांच्यात अंतिम सामना रंगला होता. १९९० नंतर जन्मलेल्या एकाही टेनिसपटूला अद्याप ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवता आलेले नाही. डॉमनिक थीम, मेदवेदेव, अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह यांसारखे खेळाडू विविध स्पर्धामध्ये विजेतेपदाच्या जवळ आले, परंतु त्यांना या त्रिमूर्तीची मक्तेदारी संपुष्टात आणणे जमले नाही.

कॅनडाच्या १९ वर्षीय बियांका आंद्रेस्कूने अमेरिकेच्या ३७ वर्षीय सेरेना विल्यम्सला धूळ चारून कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर नाव कोरले. विशेष म्हणजे २३ ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेनाने जेव्हा १९९९ मध्ये कारकीर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले, तेव्हा बियांकाचा जन्मही झाला नव्हता. बियांकाच्या रूपाने महिला एकेरीला आणखी एक युवराज्ञी मिळाली. गतवर्षीसुद्धा या स्पर्धेत जपानच्या २१ वर्षीय नाओमी ओसाकाने अंतिम सामन्यात सेरेनालाच पराभूत केले होते. त्याचप्रमाणे सलग दोन वर्षे विम्बल्डनच्याही अंतिम फेरीत सेरेनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

कारकीर्दीतील पहिलाच ग्रँडस्लॅम अंतिम सामना खेळत असूनही सेरेनासारख्या अनुभवी खेळाडूला बियांकाने ज्या सहजतेने नमवले ते वाखाणण्याजोगे होते. बियांकाचे वडील निस्कू हे मूळचे रोमानियाचे; परंतु १९९४ मध्ये व्यवसायामुळे ते कुटुंबीयांसह कायमस्वरूपी कॅनडामध्ये स्थायिक झाले. वयाच्या सातव्या वर्षी टेनिसची रॅकेट हाती घेणाऱ्या बियांकाने २०१४ मध्ये कनिष्ठ गटात खेळण्यास सुरुवात केली. २०१७ मध्ये तिने कनिष्ठ गटाचे ऑस्ट्रेलियन विजेतेपद मिळवले; परंतु २०१९ हे वर्ष बियांकासाठी खऱ्या अर्थाने कारकीर्दीला नवे वळण देणारे ठरले. वर्षांच्या सुरुवातीला तिने इंडियन वेल्स स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. यादरम्यान तिने कॅरोलिना वोझ्नियाकी, व्हिनस विल्यम्स यांना पराभूत केले, तर जुलै महिन्यात टोरंटो रॉजर्स चषक स्पर्धेतही बियांकाने जेतेपदाला गवसणी घातली.

अमेरिकन स्पर्धेची मुख्य फेरी गाठल्यावर बियांकाने मागे वळून पाहिले नाही. अंतिम सामन्यात सेरेनाला नमवून तिने अनेक विक्रम प्रस्थापित केले. ग्रँडस्लॅम जिंकणारी ती कॅनडाची पहिली खेळाडू ठरली. त्याशिवाय पहिल्याच प्रयत्नात अमेरिकन स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी ती सर्वात युवा खेळाडूही ठरली. बियांकाव्यतिरिक्त या वर्षी ओसाका, ऑस्ट्रेलियाची अ‍ॅश्ले बार्टी आणि रोमानियाची सिमोना हॅलेप यांनी अनुक्रमे ऑस्ट्रेलियन, फ्रेंच व विम्बल्डन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद मिळवल्याने टेनिसविश्वाला अनेक नव्या तारकांची ओळख झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्ट यांच्या २४ ग्रँडस्लॅम जेतेपदांची बरोबरी साधण्यासाठी उत्सुक असलेल्या सेरेनाच्या कारकीर्दीला आता उतरती कळा लागल्याचे अधोरेखित झाले.

भारतीय खेळाडूंकडून पुन्हा निराशा

भारतीय खेळाडूंना या स्पर्धेत फारशी चमक दाखवता आली नाही. पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळणाऱ्या सुमित नागलने फेडररविरुद्ध पहिला सेट जिंकल्यानंतर सर्वानीच त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव केला; परंतु त्याला सामना जिंकता आला नाही. प्रज्ञेश गुणेश्वरनलाही पहिल्याच फेरीत मेदवेदेवकडून पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीत लिएण्डर पेस व त्याचा साथीदार गुलिर्मो दुसानचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले, तर रोहन बोपण्णा व डॅनिस शापोलोव्हला उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारता आली. मुख्य म्हणजे या वर्षांतील चार ग्रँडस्लॅमपैकी एकाही स्पर्धेत भारतीय खेळाडूंना एकेरी अथवा दुहेरीत किमान उपांत्य फेरी गाठणेही जमले नाही.

त्रिमूर्तीची ग्रँडस्लॅम विजेतेपदे

फेडरर   नदाल  जोकोव्हिच

ऑस्ट्रेलियन        ६       १       ७

फ्रेंच        १      १२       १

विम्बल्डन   ८      २        ५

अमेरिकन   ५      ४        ३

एकूण        २०           १९      १६

rushikesh.bamne@expressindia.com