18 September 2020

News Flash

अमेरिकन टेनिस स्पर्धा : सेरेना, थिम उपांत्य फेरीत

मेदवेदेव, अझारेंका यांचीही विजयी वाटचाल

(संग्रहित छायाचित्र)

 

२३ ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेना विल्यम्सने स्वेताना पिरोंकोव्हावर संघर्षमय विजय मिळवताना अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. नोव्हाक जोकोव्हिचला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर जेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या डॉमिनिक थिमने सहजपणे विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे.

दोन तासांपेक्षा अधिक काळ रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पहिला सेट गमावल्यानंतर सेरेनाने जोमाने पुनरागमन करत ४-६, ६-३, ६-२ अशा विजयासह आगेकूच केली. आता २४व्या विक्रमी ग्रँडस्लॅम जेतेपदापासून ती अवघे दोन विजय दूर आहे. २०१८मध्ये बाळाला जन्म दिल्यानंतरही पिरोंकोव्हाने सेरेनाला झुंजवल्यामुळे तिचे कौतुक होत आहे.

आता उपांत्य फेरीत सेरेनाला बिगरमानांकित व्हिक्टोरिया अझारेंकाच्या आव्हानाला तोंड द्यावे लागेल. दोन वेळा अंतिम फेरी गाठणाऱ्या अझारेंकाने १६व्या मानांकित एलिस मेर्टेन्सवर निर्विवाद वर्चस्व गाजवत उपांत्य फेरी गाठली. अझारेंकाने उपांत्यपूर्व फेरीची लढत ६-१, ६-० अशी सहज जिंकत २०१३नंतर पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

पुरुषांमध्ये ऑस्ट्रियाच्या दुसऱ्या मानांकित डॉमिनिक थिमने ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स डे मिनॉरला ६-१, ६-२, ६-४ अशी धूळ चारली. आता उपांत्य फेरीत थिमसमोर तिसऱ्या मानांकित तसेच गेल्या वर्षीच्या उपविजेत्या डॅनिल मेदवेदेवचे आव्हान असणार आहे. जोकोव्हिचची हकालपट्टी तसेच रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या माघारीमुळे आता सहा वर्षांनंतर अमेरिकन स्पर्धेचा नवा विजेता मिळणार आहे.

सलग दुसऱ्या वर्षी अमेरिकन स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी उत्सुक असलेल्या रशियाच्या मेदवेदेवने आपल्याच देशाच्या आंद्रेय रुबलेव्हचा ७-६ (८/६), ६-३, ७-६ (७/५) असा पाडाव केला.

महिला दुहेरी अंतिम सामना

*  वेळ : रात्री ९.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि सिलेक्ट २

पिरोंकोव्हाने अविश्वसनीय खेळ केला. मीसुद्धा इतका चांगला खेळ करू शकले नसते. सुरुवातीला काही कारणास्तव मला थकवा जाणवत होता. पण जिंकण्याच्या उद्देशाने मी सर्वस्व पणाला लावून खेळ केला.

-सेरेना विल्यम्स

प्रत्येक सामन्यात १०० टक्के ऊर्जा राखणे मानसिकदृष्टय़ा कठीण असते. काही वेळेला प्रेक्षक हुरूप वाढवत असतात. पण विचित्र परिस्थिती उद्भवल्यामुळे मैदानावर सर्वस्वी योगदान देता येत नाही. आता उपांत्य फेरीच्या लढतीसाठी मी उत्सुक आहे.

-डॉमिनिक थिम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 12:18 am

Web Title: american tennis championships serena theme in semifinal abn 97
Next Stories
1 रेसिंग पॉइंटशी वेटेल करारबद्ध
2 टोक्यो ऑलिम्पिकसाठी लशीची अट नाही -बाख
3 सिंधू, श्रीकांतवर भारताची भिस्त
Just Now!
X