अमेरिकन स्टार महिला टेनिसपटू कोको गॉफला करोनाची लागण झाली आहे. यामुळे, ती २३ जुलैपासून सुरू होणार्‍या टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळताना दिसणार नाही. महिला टेनिस क्रमवारीत कोको २५व्या स्थानावर आहे. १७ वर्षीय कोकोने फ्रेंच ओपनची उपांत्यपूर्व फेरी आणि विम्बल्डनची चौथी फेरी गाठली होती. कोकोने काल रविवारी रात्री उशिरा ट्विटरवर आपल्याला करोना झाल्याचे आणि ऑलिम्पिकमध्ये न खेळण्याविषयी सांगितले.

कोको ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत आणि महिला दुहेरीत भागीदार निकोल मेलिचरसह भाग घेणार होती. कोकोने लिहिले, “मी करोना पॉझिटिव्ह आढळली आहे आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही. यामुळे मी फार निराश झाली आहे. ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणे हे माझे नेहमीच स्वप्न राहिले आहे आणि मला आशा आहे की भविष्यात हे वास्तव घडवून आणण्यासाठी माझ्याकडे आणखी बर्‍याच संधी असतील.”

 

हेही वाचा – पुढील स्थानक…टोकियो! सानिया मिर्झा आणि अंकिता रैना जपानला रवाना

ती पुढे म्हणाली, “मला माझ्या संघाला आणि प्रत्येक ऑलिम्पियनला शुभेच्छा द्यायच्या आहेत.” ऑलिंपिकमध्ये अमेरिकेच्या १२ सदस्यीय टेनिस संघाचे नेतृत्व कोको करणार होती. सेरेना आणि व्हिनस विल्यम्सशिवाय २५ वर्षांत पहिल्यांदा अमेरिकेचा संघ खेळणार आहे. या संघातील इतर सदस्यांमध्ये महिला एकेरीत जेनिफर ब्रॅडी, जेसिका पेग्युला आणि अ‍ॅलिसन रिस्के, पुरुष एकेरीत टॉमी पॉल, फ्रान्सिस टियाफो, टेनिस सँडग्रेन आणि मार्कोस गिरॉन यांचा समावेश आहे. बेथानी मॅटेक-सँड्स, राजीव राम आणि ऑस्टिन क्रेजिसेक हे संघाचे अन्य सदस्य आहेत.