करोना विषाणूच्या तडाख्यातून हळूहळू सावरत पहिली कसोटी मालिका इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यात खेळली गेली. भारताचा सध्या कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा प्रस्तावित नाही. पण डिसेंबर-जानेवारीमध्ये भारत ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ३ डिसेंबर ते १७ जानेवारी दरम्यान असणार आहे. यात चार कसोटी सामने आणि तीन वन डे सामने खेळले जाणार आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या वार्षिक वेळापत्रकात या सामन्यांची ठिकाणं आणि वेळ निश्चित केली होती. पण आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया यात काही बदल करण्याचा निर्णय घेत असल्याचे बोलले जात आहे.

सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार, व्हिक्टोरिया विभागात करोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसात वाढताना दिसला आहे. त्यामुळे २६ ते ३० डिसेंबर दरम्यान रंगणारी भारत-ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे कसोटी मेलबर्नऐवजी अ‍ॅडलेड येथे खेळवण्याचा विचार क्रिकेट ऑस्ट्रेलिया करत आहे. मेलबर्न हे व्हिक्टोरिया विभागाजवळील शहर आहे. त्यामुळे तेथील करोना रूग्णांची होणारी वाढ चिंताजनक असल्याने तेथील सामना दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा विचार क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सुरू आहे. यात अ‍ॅडलेडचे नाव चर्चेत आहे.

बॉक्सिंग डे कसोटी सामन्याचे ठिकाण बदलण्यासंदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमन अर्ल एडिंग्स यांनी पुढील आठवड्यात क्रिकेट कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. भारतीय संघ ११ ऑक्टोबरपासूनच ऑस्ट्रेलियात क्रिकेट मालिका खेळणार होता. पण टी-२० विश्वचषक रद्द झाल्याने भारताने तो दौरा रद्द केला.

दरम्यान, सध्या व्हिक्टोरिया विभागात करोनाच्या १३,००० पॉझिटिव्ह केस आहेत. तर १७० जण करोनामुळे दगावले आहेत.