जगभरात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जगभरातील महत्वाच्या व्यक्ती आपापल्यापरीने अन्नदान, वैद्यकीय वस्तूंचं मोफत वाटप करत आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिदी आफ्रिदीनेही आपल्या परिसरातील गरीब आणि गरजू व्यक्तींसाठी मोफत अन्न आणि वैद्यकीय गोष्टींचं मोफत वाटप केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शाहिदी आफ्रिदी आपल्या सामाजिक संस्थेद्वारे हे दान करत आहे.

आफ्रिदी सध्या आपल्या संस्थेद्वारे गरजू व्यक्तींसाठी ‘डोनेट करो ना’ हे अभियान चालवतो आहे. या अभियानाअंतर्गत आफ्रिदीने पाकिस्तानातील हिंदू आणि ख्रिश्चन वस्त्यांमधील गरजू व्यक्तींना अन्नदान केलं. आफ्रिदीने आपल्या या मदतकार्याचे फोटो ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि युवराज सिंह यांनीही आफ्रिदीच्या या कामाचं कौतुक केलं आहे. संपूर्ण जग खडतर परिस्थितीतून जात असताना आफ्रिदीचं काम वाखणण्याजोगं असल्याचं हरभजन आणि युवीने म्हणलं होतं. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात हिंदू व्यक्तींना रेशनवर धान्य मिळत नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र आफ्रिदीने या खडतर काळात धर्माचा विचार न करता माणुसकीला महत्व देत एक वेगळं उदाहरण घालून दिलं आहे.