जागतिक बॉक्सिंग क्रमवारीत मेरी कोम पाचव्या क्रमांकावर

नवी दिल्ली : जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणारा भारताचा अव्वल बॉक्सर अमित पांघल (५२ किलो) याने पुढील महिन्यात होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) बॉक्सिंग टास्क फोर्सच्या क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आहे. आपल्या गटात जागतिक अग्रस्थान पटकावणारा अमित हा भारताचा पहिला बॉक्सर ठरला आहे.

२००९ मध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या विजेंदर सिंगने ७५ किलो वजनी गटात अग्रस्थान पटकावण्याची किमया केली होती. २४ वर्षीय अमित ४२० गुणांसह अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. पैशांची अफरातफर आणि गैरप्रशासनामुळे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघावर सध्या ‘आयओसी’ने निलंबनाची कारवाई केल्यामुळे आयओसीच्या बॉक्सिंग टास्क फोर्सने क्रमवारी जाहीर केली आहे.

गेल्या दोन जागतिक अजिंक्यपद स्पर्धा (पुरुष आणि महिला) तसेच आंतरखंडीय स्पर्धेतील कामगिरी पाहून क्रमवारी ठरवण्यात आली आहे. आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा पुढील महिन्यात जॉर्डन येथील अमानमध्ये रंगणार आहे.

पांघलने २०१८च्या राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. २०१७ पासून त्याची यशस्वी वाटचाल कायम आहे. गेल्या वर्षी जागतिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला होता.

महिला क्रमवारीत, सहा वेळा जगज्जेती ठरलेल्या एम. सी. मेरी कोम हिला ५१ किलो गटात पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. गेल्या वर्षी कांस्यपदकाची कमाई करून आपले आठवे जागतिक पदक मिळवणाऱ्या मेरी कोमच्या खात्यात २२५ गुण जमा आहेत. तिची प्रतिस्पर्धी निखत झरीन हिने ७५ गुणांसह २२वे स्थान प्राप्त केले आहे. लव्हलिना बोर्गोहेन हिने ६९ किलो वजनी गटात तिसरे स्थान मिळवले आहे. २२ वर्षीय लव्हलिनाने दोन वेळा जागतिक पदकांवर नाव कोरले आहे. दोन वेळा जागतिक पदकविजेती आणि आशियाई रौप्यपदक विजेती सोनिया चहल हिने ५७ किलो गटात १०वे स्थान मिळवले आहे.

पुरुषांमध्ये आशियाई रौप्यपदक विजेत्या कविंदर सिंग बिश्तने (५७ किलो) १९० गुणांसह सातवे आणि माजी जागतिक कांस्यपदक विजेत्या गौरव बिदुरीने ३२वे स्थान पटकावले आहे. ६३ किलो गटात जागतिक कांस्यपदक विजेता मनीष कौशिक १२व्या क्रमांकावर आहे. चार वेळा आशियाई विजेता ठरलेल्या शिवा थापा याला ३६व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

हा खूपच सुखावणारा क्षण असून माझ्यासाठी क्रमवारीतील अग्रस्थान खूप मोठी झेप म्हणावी लागेल. यामुळे मला पात्रता फेरीत मानांकन मिळणार आहे. जगात अव्वल स्थानी असल्यामुळे प्रतिस्पध्र्याशी दोन हात करताना एक वेगळाच आत्मविश्वास मिळतो. पहिल्या पात्रता फेरीच्या स्पर्धेतच मी टोक्यो ऑलिम्पिकसाठी स्थान मिळवेन, अशी आशा आहे.

– अमित पांघल, भारताचा अव्वल बॉक्सर