जागतिक बॉक्सिंग स्पर्धा

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता अमित पांघल (५२ किलो), रौप्यपदक विजेता कविंदर सिंग बिश्त (६७ किलो), राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता मनीष कौशिक (६३ किलो) आणि संजीत (९१ किलो) यांनी जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

मंगळवारी द्वितीय मानांकित अमितने तुर्कीच्या बटूहान सिटफसीचा, तर मनीषने मोंगोलियाच्या चौथ्या मानांकित चिनझोरिग बाटारसुखचा ५-० असा सहज पराभव केला. आता पुढील फेरीत २३ वर्षीय अमितची गाठ फिलिपिनो कार्लो पालमशी पडणार आहे. गेल्या वर्षी जकार्ताला झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अमितने फिलिपिनोचा उपांत्य फेरीत पराभव केला होता. उपउपांत्य फेरीत फिलिपिनोने कोरियाच्या जो सेहयेओंगला नमवले. संजीतने उझबेकिस्तानच्या द्वितीय मानांकित संजर टुर्सुनोव्हचा ३-२ असा पराभव केला. कविंदरने फिनलँडच्या अर्सलान खाटीव्हचा ३-२ असा पराभव केला.

मनीषची उपांत्यपूर्व फेरीत ब्राझिलच्या वाँडरसन डी ऑलिव्हिराशी गाठ पडणार आहे. ऑलिव्हिराने उपउपांत्यपूर्व सामन्यात जपानच्या सायसुके नरिमत्सूला पराभूत केले.

अमितची बटूहानविरुद्धची लढत सुरुवातीला फारशी रंगली नाही. परंतु अमितने उत्तम आक्रमण केले. बटूहानने प्रतिहल्ल्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्याचा निभाव लागला नाही. बल्गेरियात होणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्ट्रँजा स्मृती बॉक्सिंग स्पर्धेत दोनदा सुवर्णपदक जिंकणाऱ्या अमितने २०१७च्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.