नवी दिल्ली : थाय (बँकॉक ) येथे १९ ते २८ एप्रिल दरम्यान होणाऱ्या आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेसाठी अमित पंगहल आणि शिवा थापाची निवड भारतीय संघात झाली आहे. आशियाची स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा अमित ५२ किलो वजनगटात पहिल्यांदाच रिंगणात उतरणार आहे, तर थापा ६० किलो वजनगटात सलग चौथ्यांदा पदक जिंकण्यास उत्सुक असेल.

पंगहलने गेल्या महिन्यात झालेल्या स्ट्रन्जा स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित मुष्टियुद्ध स्पर्धेत ४९ वजनगटात सलग दोन वर्षे सुवर्णपदक जिंकले आहे, तर थापाने फिनलॅण्डमध्ये झालेल्या गीबी स्पर्धेत रौप्यपदक पटकावून यंदाच्या वर्षी चांगली सुरुवात केली. आसामचा सुवर्णपदक विजेता थापाने आशियाई स्पर्धेत तीन पदके आपल्या नावे केली आहे. २०१३ मध्ये सुवर्ण, २०१५ मध्ये रौप्य आणि २०१७ मध्ये परत रौप्यपदक आपल्या नावे केले आहे. ४९ किलो वजनगटात राष्ट्रीय विजेता दीपक सिंग आपले नशीब आजमावणार आहे. दीपकसिंगने या महिन्याच्या सुरुवातीला इराण येथे झालेल्या मकरान चषकात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे, तर ५६ किलो वजनगटात गीबी मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक विजेता किवदरसिंग भिस्त रिंगणात असेल. कॉमनवेल्थ खेळात सुवर्णपदक विजेता सतीश कुमार ९१ किलोपेक्षा अधिकच्या वजनगटात उतरणार आहे. सतीशने यापूर्वी २०१५ च्या अशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. आशियाई स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावणाऱ्या खेळाडूंना आम्ही यावर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी प्राधान्य देऊ, असे राष्ट्रीय प्रशिक्षक सी.के. कुटप्पा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

भारतीय संघ : दीपक (४९ किलो), अमित पंगहल (५२ किलो), किवदरसिंग भिस्त (५६ किलो), शिवा थापा (६० किलो), रोहित टोकस (६४ किलो),आशीष (६९ किलो),आशीषकुमार (७५  किलो), ब्रिजेश यादव (८१ किलो), नमन तन्वर (९१), सतीशकुमार (९१ किलो अधिक).